खर्गे यांच्या अब्रूची लक्तरं टांगली संसदेच्या वेशीवर !

संसदेची सभागृहे हळूहळू कुस्तीचे आखाडे बनत चालली की काय ? अशी शंका येऊ लागली आहे. सत्ताधारी एनडीए आघाडी आणि काँग्रेसप्रणित सर्व विरोधी पक्षांची ‘तू..तू..मैं..मैं’ नेहमीच सभागृहात पाहायला मिळत होती. पण, गेल्या आठवड्यात मुद्द्यांचा वाद गुद्यावर आला, आणि भाजपाचा खासदार जबर जखमी होण्यापर्यंत हा वाद पोहोचला. वाद नेमका कुणामुळे आणि कशामुळे? हा वेगळा मुद्दा होऊ शकतो. पण, हल्ली झालंय काय, संसदेची सभागृहे असोत, नाहीतर विधिमंडळाची चर्चेद्वारे प्रश्न सोडवायचेच नाहीत, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे सभागृहामध्ये पूर्वी जी चर्चा होत होती, तिला फाटा मिळाला आहे. यावर इलाज म्हणून विरोधी पक्षांनी संसदेच्या बाहेर किंवा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करून वातावरण बिघडवायचे आणि माध्यमांना हाताशी धरून बातम्या छापून आणायच्या, असा नवा फंडा शोधला आहे.
वास्तविक, विरोधकांच्या या भूमिकेचा तसूभरही परिणाम सत्ताधाऱ्यांवर होतं नाही. त्यांचे कामकाज सुरू असते, त्यांना हवी ती विधेयके मांडली जातात, त्यांना हवे ते प्रस्ताव संमत होत असतात. पण, विरोधकांची आगपाखड जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम विरोधक अचूक साधतात, हा भाग वेगळा !
आगामी पाच वर्षे निवांत !
केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार किंवा राज्यामधील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पूर्ण पाच वर्षे कालावधीत स्थिर राहणार आहेत, हे विरोधकांनाही मान्य आहे. दोघांच्याकडे प्रचंड बहुमत असल्यामुळे विरोधकांचे काहीही चालणार नाही, याची कल्पना सुद्धा त्यांना आहे. त्यामुळे सरकारला सभागृहात ‘काउंटर’ करता येणार नाही, तेवढी ताकद नाही हे लक्षात आल्यामुळे सभागृह बाहेर ‘कामकाज’ करण्याचा हा नवा डाव विरोधकांनी रचला आहे. सभागृहाबाहेर एक तर वादावादी होण्याचा प्रश्न नसतो, आणि माध्यमांपुढे स्पष्ट भूमिका मांडता येते, ती अयोग्य काय योग्य हा वेगळा विषय.. आणि सभागृहात असेल तर आता सत्ताधाऱ्यांची बाजू ऐकून घेण्याची मन:स्थिती नसल्यामुळे हाणामाऱ्यापर्यंत मजल पोहचली आहे, ती बाब लोकशाहीसाठी निश्चितच चिंताजनक आहे. कोणत्याही सभागृहातील सदस्य जखमी होणे, नक्कीच भूषणावह नाही.. आज जखमी झाला पण उद्या हेच सदस्य सभागृहात पिस्तुलासारखी हत्यारे आणण्यासही कमी करणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.
मोदींकडून खर्गे चारीमुंड्या चीत
सभागृहामध्ये सत्ताधारी बाकांचे प्रमुख आणि विरोधी पक्षांचे प्रमुख यांची खडाजंगी नेहमीच चालते. पण, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने त्यांचे वाभाडे काढले आणि त्यांच्या अब्रूची लक्तरे संसदेच्या वेशीवर टांगली, तो प्रकार अद्भुत म्हणावा लागेल. हातामध्ये कसलाही संदर्भ किंवा चिठ्ठीचपाटी नसताना पंतप्रधानांनी जो हल्ला चढवला, तो पाहून खर्गे तर नक्कीच अवाक झाले असतील, पण विरोधी बाकांवर स्मशान शांतता पसरली. कित्येक दिवसानंतर मोदींनी अशा प्रकारचा चौफेर शाब्दिक हल्ला चढवला. मोदी काय म्हणाले, हे या पार्श्वभूमीवर मुद्दाम लक्षात घ्यायला हवे. काय म्हणाले नरेंद्र मोदी?
संपूर्ण भारत पंतप्रधान मोदींना मृदुभाषी म्हणून ओळखतो. पण,आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही, की ते त्यांच्या विरोधकांवर हल्ला करून कसे नामोहरम करतात ? आणि कसे विरोधकांच्या नाकी दम आणतात ! त्याचे एक उत्तम उदाहरण संसदेत पाहायला मिळाले. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे हे दलित आहेत,सर्वांना माहीत आहे. आपल्या या जातीचा उपयोग ते चपखलपणे नेहमी भाषणात करीत असतात, त्याचे फायदे घेत असतात. संसदेत काय झाले.. एका आक्रमक सैनिकाच्या आवेशात त्यांनी अचानक एक प्रश्न उपस्थित केला. अक्षरशः जोरदार आवाजात किंचाळत, हातवारे करीत मोदींना प्रश्न विचारला..आमच्यासारख्या दलित जनतेसाठी तुम्ही काय केलेत ? तुम्ही प्रत्येक दलित कुटुंबाला किमान एक टक्का जमीन द्यावी, आम्हाला जगण्याचा हक्क आहे, आम्ही जगू नये का ? लोकसभेत स्मशान शांतता पसरली.
मोदींचे आक्रमण आणि हतबल खर्गे
अचानक आलेल्या आक्रमक प्रश्नामुळे सभागृहात अधिकारी भांबावले..माहिती तयार नव्हती.. माहिती संकलित करून एक तासानंतर उत्तर देण्यात येईल, असा अभिप्रायाचा कागद अधिकाऱ्यांनी मोदींच्या डेस्कवर दिला. मोदींनी कागदाकडे न पाहताच कागद बाजूला सरकवला.. मोदींच्या चेहऱ्याचे भाव बदलत होते, सर्वजण खुर्चीवर गोठल्यासारखे बसले होते. सभागृहाच्या नजरा मोदींवर खिळल्या होत्या.. श्वास थांबले होते.. मोदींनी थोडा वेळ घेतला आणि आपल्या जागेवरून उठले, शाब्दिक हल्ला चढवण्यासाठी !
त्यांनी शांतपणे खर्गे यांना विचारले, ‘तुम्ही स्वतः दलित नाही कां ?’ तुमच्या ताब्यात किती जमीन आहे,माहीत आहे का? तुम्हाला माहीत नसेल, आठवत नसेल तर मी उघड करून सांगतो.. खर्गे संकोचत असल्याचे पाहून मोदींनी आवाज वाढवला..’तुम्हीं सांगणार नसाल तर ठीक आहे ; मी स्वतःच सांगतो !
खर्गे यांच्या मालमत्तेची जंत्रीच
तुमचे बंगळुरूच्या बन्नरघाटा परिसरात ५०० कोटी रुपयांचे व्यापारी संकुल आहे. चिकमंगलूर येथे ३०० एकर क्षेत्रफळ असलेली कॉफी इस्टेट आहे. त्या ठिकाणीच आहे तुमचा सुमारे 50 कोटींचा बंगला ! केंगेरी येथे ४० कोटी रुपयांचे फार्म हाऊस ! रामय्या कॉलेजजवळ २५ कोटींची इमारत ! बंगळुरू येथे आर. टी. नगर मध्ये आणखी ११० कोटींचा एक बंगला आहे. बेल्लारी रोड येथे 17 एकर शेतजमीन आहे. याशिवाय, इंदिरानगर बंगलोरमधील तीन मजली इमारत! बंगळुरू मध्ये सदाशिवनगरमध्ये दोन बंगले लक्षात आहे ना खर्गेसाहेब ! मोदी पुढे बोलतच राहिले..वरील व्यतिरिक्त मी म्हैसूर येथे असलेल्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरील मालमत्तांची यादी सांगू का?गुलबर्गा, चेन्नई, गोवा, पुणे, नागपूर, मुंबई आणि दिल्ली ? एक ना दोन खर्गे यांच्या मालमत्तेची यादी वाढतच राहिली. मोदींनी सादर केलेली जंत्री, ती सुद्धा हातात चिट्ठी किंवा कागद न घेता.. संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले !
खर्गे यांनी अचानक विचारलेला प्रश्न..ज्याचे उत्तर सरकारकडे तयार नसेल, असा अंदाज असलेले मल्लिकार्जुन खर्गे हतबल झाले. त्यांचा चेहरा फिका पडला.. फक्त मान खाली घालून घाम पुसत राहिले ! मोदी पुन्हा कडाडले,’जर एक टक्का जमीन दलितांना दिली, तर वरील सर्व व्यक्तींना जमीन देण्याची गरज नाही का मोदींकडे सर्वांच्या कुंडल्या असल्याची पुन्हा एकदा खात्री पटली..काँग्रेसच्या गोटात दफनभूमी सारखी शांतता होती. काँग्रेसचा एकही सहकारी तोंड उघडू शकला नाही.
सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी टाळ्या व डेस्कवर आवाज काढण्यास सुरुवात केली आणि तो आवाज संपूर्ण संसदेत घुमू लागला. काँग्रेस पक्षाची पूर्ण जिरली होती. नरेंद्र मोदी यांच्या या अभ्यासू वृत्तीमुळे आज ते संपूर्ण जगापुढे एक आदर्श विश्वगुरू म्हणून येत आहेत. समोर कुठला संदर्भही नसताना केवळ अभ्यासाच्या द्वारे त्यांनी सर्व प्रतिस्पर्ध्यांवर नेहमीच मात केली आहे, त्याचे एक छोटेसे उदाहरण मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रूपाने त्यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. या धक्क्यातून काँग्रेस पक्ष सावरायला बरेच दिवस जाणार आहेत हे मात्र निश्चित!