‘‘जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो…’’ : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ‘बॅक टू पॅव्हेलिअन’
विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड म्हणतात : ... बंडखोरीतील पहिला मोहरा परत!
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील ऐतिहासिक बंडानंतर अजित पवार यांच्या गटात सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘बॅक टू पॅव्हेलिअन’ चा निर्णय घेतला आहे.
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे ‘बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण’… अशी भूमिका घेत डॉ. कोल्हे यांनी मी शरद पवार साहेबांसोबत आहे, असा दावा केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अन्य ८ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी आपण ‘पवार साहेबांसोबत’ आहोत, असा दावा डॉ. कोल्हे यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार गटाला पहिला धक्का बसला आहे, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जितेंद्र आव्हाड यांची पक्ष प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली. डॉ. कोल्हे यांच्या निर्णयानंतर ‘‘पहिला मोहरा परत…’’ अशी सूचक टीपण्णी आव्हाड यांनी केली आहे.