कार्यक्रमाला येण्यासाठी महिलांना धमकी; सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
![Intimidation of women to attend the event; Serious accusation of Supriya Sule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Supriya-Sule-1-780x470.jpg)
पुणे | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आज (शनिवारी) राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. सरकारकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ज्या लाभार्थी महिला उपस्थित राहणार नाहीत, त्यांचे अर्ज रद्द केले जातील, असा मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.
सुप्रिया सुळेंनी लिहिले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘चिंचवडमधून आता नाना काटे यंदा आमदार होणारच’; युवा नेते पार्थ पवार
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील लाखो लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.