पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मालमत्ता करातील सवलत पुन्हा सुरू
![If you live in your own house through Pune Municipal Corporation, you will get 40 percent discount on house rent](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Pune-corporation-780x470.jpg)
पुणे : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापूर्वी मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांची असलेली अनेक वर्षांपासुनची मागणी आता पूर्ण झाली असून नुकत्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणेकरांना घरपट्टीत सवलत देण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे.
मार्च २०२३ मध्ये अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत कापट्टी सवलतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करताना वार्षिक भाड्यातून १०% ऐवजी १५% सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षिक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करताना ४० टक्के सवलत देण्यात येणार आहे. १ एप्रिल, २०२३ पासून ४० टक्के मालमत्ता कर सवलत निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.