अजित पवार म्हणत असतील, तर उमेदवारही बदलू, पण निवडणूक बिनविरोध करुया : चंद्रशेखर बावनकुळे
![If Ajit Pawar is saying, then the candidate will also change, but let's conduct the election unopposed: Chandrasekhar Bawankule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/ajitpawar-chandrashekharbawankule-780x470.jpg)
पुणे । विशेष प्रतिनिधी
पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. याकरिता भाजपा शेवटपर्यंत विनंती करीत आहे. उद्या ३ वाजेपर्यंत महाविकास आघाडीला निर्णय घेण्याची संधी आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, प्रसंगी उमेदवार बदलायला तयार आहोत, अशी भूमिकाही बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उद्या, दि. ७ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे.
मात्र, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन भाजपा महायुतीसह मनसेनेसुद्धा केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती केली आहे.
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आवाहन केले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यासाठी आम्ही प्रसंगी संबंधित उमेदवार बदलण्याची तयारीसुद्धा ठेवली आहे, असे ते म्हणाले.
…तर टिळकांच्या कुटुंबामध्ये उमेदवारी देवू : बावनकुळे
महाविकास आघाडीची भूमिका असेल, की कसब्यामध्ये टिळक कुटुंबामध्ये उमेदवारी द्यावी, तर आम्ही उमेदवारी देण्यास तयार आहोत. मूळात निवडणूक होवू नये, अशी आमची अपेक्षा आहे. आठ-दहा महिन्यांकरिता निवडणूक नको, अशीच भूमिका आहे. उमेदवार बदलण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. टिळक कुटुंब हा भाजपाचा परिवार आहे. त्यामध्ये नाराजी असण्याचे कारण नाही, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.