मला भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही; एकनाथ खडसेंकडून पुन्हा महाजनांवर निशाणा

जळगाव : एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजप मध्ये जाण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी दिल्लीत जावून भाजपच्या पक्षश्रेष्ठींचीदेखील भेट घेतली होती. पण राज्यातील काही भाजप नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. यानंतर आता एकनाथ खडसे यांनी आपली भाजपात जाण्याची इच्छा होती हे मान्य केलं आहे. पण नुकतंच भाजप नेते गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने नाशिकमध्ये ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावरुन एकनाथ खडसे यांनी टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
मला आता भारतीय जनता पार्टीमध्ये यायची अजिबात इच्छा नाही. माझी भाजपमध्ये यायची इच्छा होती. पण बॉम्बस्फोटामध्ये दाऊद इब्राहिमच्या सोबत जो सलीम कुत्ता आहे त्याच्यासोबत नाचणाऱ्यांना भाजपमध्ये घेतले असल्याने मला भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसोबत माझी काम करायची इच्छा नाही”, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केला.
हेही वाचा – राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा
मी महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी मी 40 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे. मी आणीबाणीचे चटके सोसले आहेत. त्यावेळी मी २५ वर्षांचा होतो. तरी आणीबाणीचा काळ मी अनुभवला आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले. “संघाने कोणी कोणत्या पक्षात रहावे याबाबत सूचना केलेल्या नाहीत. भाजप म्हणजे संघ असेल, असे गिरीश महाजन म्हणत असतील तर ते संघाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. मी देखील संघाचा स्वयंसेवक आहे. संघाने कधी भाजपमध्ये राहा असे सांगितले नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये राहा किंवा काँग्रेस पक्षामध्ये राहा. पण हिंदुत्वाचा मुद्दा राहिला पाहिजे हेच संघाने शिकवलं आहे”, असे एकनाथ खडसे म्हणाले.