breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

‘‘मैं समुंदर हूँ…लौटकर वापस जरुर आऊंगा’’ । माजी आमदार विलास लांडे यांची ‘बोलकी पोस्ट’ सोशल मीडियावर व्हायरल!

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील वस्ताद आता ‘नवा डाव’ टाकणार : भोसरी विधानसभा आगामी निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत घुमसान

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील ‘वस्ताद’ अशी ओळख असलेले माजी आमदार विलास लांडे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘नवा डाव’ टाकण्याच्या तयारी आहेत. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी लांडे यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक विक्रांत लांडे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे शहराध्यक्षांसह १४ नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विशेष म्हणजे, स्वत: विलास लांडे यांनी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे व्हीडिओ प्रसारमाध्यमांमधून पुढे आले. त्यामुळे अजित पवार गटातून शहराध्यक्षांसह १४ माजी नगरसेवक बाहेर पडण्याच्या खेळीमागे विलास लांडे यांचा चाल आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्व. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी सुरूंग लावला. २०१७ मध्ये राष्ट्रवादीची महापालिकेतून सत्ता गेली. तसेच, २०१९ मध्ये राष्ट्रवादीला चिंचवड आणि भोसरी मतदार संघात अधिकृत उमेदवारही देता आला नाही.

विधानसभा निवडणूक ३ महिन्यांवर आली असताना सध्यस्थितीला महायुतीकडे शहरात अश्विनी जगताप, महेश लांडगे, आण्णा बनसोडे, उमा खापरे आणि आता अमित गोरखे असे पाच आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे एवढ्या बलाढ्य शक्तीला तोडीस तोड स्थानिक नेता नाही. त्यामुळे ही पोकळी भरुन काढण्यासाठी शरद पवार यांनी ‘‘हुकमी एक्का’’ बाहेर काढला आहे. माजी आमदार विलास लांडे असा एकमेव नेता आहेत. जे पिंपरी-चिंचवडमधील महायुतीच्या विरोधी वज्रमूठ बांधू शकतील. आता ही रणनिती जवळपास निश्चित झाली आहे. कारण, ‘‘मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे घर मत बना लेना। मैं समुंदर हूँ लौटकर वापस जरुर आऊंगा’’ अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

विलास लांडे यांच्यावर अन्यायाची मालिका…

राष्ट्रवादीच्या तत्कालीन पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार विलास लांडे यांचे पंख छाटण्याची भूमिका घेतली. २०१४ मध्ये भोसरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तत्कालीन नगरसेवकांनी आणि स्थानिक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांचे काम केले. त्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी कोणतीही कारवाई केली नाही. २०१९ च्या निवडणुकीत स्व. दत्ताकाका साने यांनी उमेदवारीवर दावा केला. त्यामुळे साने की लांडे यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय झाला नाही. अखेर लांडे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून लांडे यांनी मागणी केली होती. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी लांडे यांनी अर्ज भरला. पण, त्यावेळी अर्ज मागे घेण्याची सूचना त्यांना करण्यात आली.

अजित पवारांसोबत जावून काय मिळाले?

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी विलास लांडे यांचा शब्द ‘प्रमाण’ होता. मात्र, २००९ पासून २०२४ पर्यंत अजित पवार आणि पक्षश्रेष्ठी यांनी लांडे यांना निर्णयप्रक्रियेतून ‘साईडट्रॅक’ केले. त्याची किंमत लांडे आणि पक्षालासुद्धा मोजावी लागली. शहरातील सत्तेतून राष्ट्रवादी एकप्रकारे हद्दपार झाली आणि लांडे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी महायुतीमध्ये सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लांडे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, अनेकदा ते शरद पवार यांच्या व्यासपीठावरही दिसले. राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची जी अवस्था झाली, तिच लांडेंनी अनुभवली. २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघातून मी इच्छुक आहे. तयारी आहे. असा दावा करणाऱ्या लांडे यांना अजित पवारांनी डावलले. त्या ठिकाणी आयात उमेदवाराला संधी देण्यात आली. त्यामुळे भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील विलास लांडे समर्थकांमध्ये मोठी चिड आहे. ‘अजित पवार यांच्यासोबत जावून काय मिळाले?’ असा प्रश्न उपस्थित करीत लांडे समर्थक मोठी टीम आता शरद पवार यांच्या वाटेवर आहे.

विलास लांडे विरुद्ध महेश लांडगे लढत…

भोसरी विधानसभा मतदार संघातून आपण इच्छुक नाही, अशी चर्चा विलास लांडे यांनी स्वत: घडवून आणली आहे. त्याचे भाचे आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी ‘‘मी इच्छुक आहे’’ असा दावा करीत महायुतीत बंडखोरीचे संकेत १५ दिवसांपूर्वीच दिले. त्यांच्यासोबत १४ माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली आणि बंडाचे निशान फडकवले. मात्र, खरा योद्धा अद्याप मैदानात उतरलेला नाही, असेच चित्र होते. विलास लांडे शरद पवार गटात प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. तसेच, भोसरीची जागा ‘तुतारी’ला सोडण्यात येणार असून, त्या बदल्यात पिंपरीची जागा ‘मशाल’ चिन्हावर लढवली जाणार आहे. त्यामुळे भोसरीत विलास लांडे विरुद्ध भाजपाचे महेश लांडगे असा सामना पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. या लढाईत लांडे यांच्या ‘रथाचे सारथी’ म्हणून अजित गव्हाणे असतील, असे राजकीय जाणकार सांगतात. कारण, राजकीय भविष्य नसेल किंवा महत्त्वाकांक्षा नसेल, तर विलास लांडे शरद पवार गटात का प्रवेश करतील? असा साधा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button