‘नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज’; काँग्रेस नेत्याचं विधान चर्चेत
![Hiraman Khoskar said that many MLAs are upset since Nana Patole became the state president](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Nana-Patole-1-780x470.jpg)
मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या जवळपास ७ मतं फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. यातच काँग्रेसचे आमदार हिरमण खोसकर यांनी मोठं विधान केलं आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचं हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे.
हिरामण खोसकर नेमकं काय म्हणाले?
विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी एक दिवस हॉटेलमध्ये आमची सर्वांची चर्चा झाली होती. यावेळी कोणाला मतदान द्यायचं? हे ठरलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता उपस्थित राहायचं असं ठरलं. त्यानंतर साडेसात वाजता सर्व आमदार आले आणि चर्चा सुरु झाली. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे ११ वाजता आले. त्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली. आम्हाला सात जणांना मिलिंद नार्वेकरांना मतदान करायचं आणि सहा जणांना शेकापचे जयंत पाटील यांना मतदान करायचं आणि २५ आमदारांनी प्रज्ञा सातव यांना मतदान करायचं असं सांगण्यात आलं होतं.
विधानपरिषदेसाठी कशा पद्धतीचे मतदान करायचं याबाबत सांगण्यात आलं. यामध्ये एक मतदान फुटलं. पण ते मतदान कुणाचं फुटलं? मग जयंत पाटील यांना काँग्रेसचे सहा मत द्यायला सांगितले होते. पण काँग्रेसचं एकही मत त्यांना पडलं नाही. आता त्या सहा लोकांवर कुठलीही कारवाई केली नाही. मग ते सहा आमदार कोण होते, ते त्यांना माहिती नाही का? मागच्यावेळी माझ्याकडून चूक झाली होती. त्यानंतर मी वरिष्ठांना सांगितलं होतं की माझ्याकडून चूक झाली. पण यावेळी मी शपथ घेतली होती की मी चुकणार नाही. पण जे सहा आमदार फुटले त्यांच्यावर कारवाई न करता माझी बदनामी सुरु केली आहे, ही बदनामी वरिष्ठांनी थांबवली पाहिजे.
हेही वाचा – Pimpri Chinchwad | पुजा खेडकर यांना वायसीएम रुग्णालयाचेही अपंगत्व प्रमाणपत्र
आता लहान तोंडी मोठा घास माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यांनी घेऊ नये. मात्र, बरेच आमदार नाराज आहेत. मी गरिब माणूस आहे. आम्ही सन्मानाने राहतो. पाच वर्षात आम्ही कुठेही काही बोललो नाहीत. त्यामुळे आता जी काय बदनामी चालू आहे ती बदनामी पक्षश्रेष्ठींनी थांबवली पाहिजे. तसेच गेल्या पाच वर्षात आमदारांची एक मिटिंगही घेतली नाही. फक्त निवडणूक आली की तुम्ही दोन दिवस बोलवायचं आणि वाऱ्यावर सोडून द्यायचं. तीच मिटिंग आधी झाली असती तर मतदानामध्ये फरक पडला असता.
कोण उमेदवार द्यायचे याबाबत पक्षाला अधिकार आहेत. मात्र, तुम्हाला उमेदवारी द्यायची नसेल तर देऊ नका. पण बदनामी करु नका. मी अजूनही पक्षाबरोबर आहे. पण पक्षाने तिकीट दिले नाही तर मला काही कार्यकर्ते शांत बसू देणार नाही. मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. काय भूमिका घ्यायची ते कार्यकर्ते ठरवतील मी ठरवणार नाही.
पक्षश्रेष्ठींनी गेल्या पाच वर्षांत एकाही आमदाराला विचारलं नाही. आमचे काम होतात की नाही होत, याबाबत विचारलं पाहिजे. मात्र, पक्षश्रेष्ठी कधीही विचारत नाहीत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत. पण आमची अपेक्षा आहे की त्यांनी दोन महिन्यांमधून एखाद्या दिवस तरी विचारलं पाहिजे. विकासाच्या बाबातीत बोललं पाहिजे. पण त्यांना भेटलं की फक्त तुम्ही असं केलं, तसं केलं असंच बोलतात. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कधीही ते आमदारांना प्रेमाणे बोलले नाहीत. याबाबत वरिष्ठांकडे काही आमदारांनी तक्रार केली आहे, असंही हिरामण खोसकर म्हणाले.