breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीय

अहो…परत या; चिंचवडकर वाट पहाताहेत! : अश्विनी जगताप यांचे भावनिक पत्र!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच (दि.३ जानेवारी २०२३) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जगताप कुटुंबीय आणि समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खातून सावरत असतानाच अल्पावधीत चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लागली.

दि. १५ फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षी दिवंगत आमदार जगताप यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. मात्र, यावर्षी त्यांच्या कुटुंबीयांना आणि सर्वपक्षीय समर्थकांना ‘‘जयंती’’ साजरी करावी लागत आहे. अत्यंत भावपूर्ण वातावरणात सांगवी येथील स्मृतीस्थळी काल जगताप कुटुंबीय आणि समर्थकांनी अभिवादन केले.

दरम्यान, दिवंगत जगताप यांच्या पत्नी आणि पोटनिवडणुकीतील भाजपा+ बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे.
या पत्रात अश्विनी जगताप म्हणतात…

पत्रास कारण की… अहो,

काल तुमची जयंती. खरं तर वाढदिवस आनंदाचा दिवस, गेल्या वर्षीपर्यंत हा दिवस संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये अगदी आनंदाने उत्साहाने साजरा होत होता. पण दैवाने घात केला आणि तुम्ही अचानक निघून गेलात. तुमच्या जाण्याने कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला. काल पहिल्यांदा तुमची जयंती साजरी झाली.

हे पत्र त्यामुळेच लिहावं वाटलं, तुम्हाला सांगावं वाटलं तुमच्या जाण्याने इथे कित्येक लोकांनी आपलं माणूस गमावले आहे. तुम्ही कमावलेला प्रत्येक माणूस काल तुमच्या स्मृती स्थळी लीन होत असताना तुमच्या आठवणीत भावुक झाला होता. येणारा प्रत्येक जण मनात आठवणी आणि डोळ्यात अश्रू घेऊन येत होता. आज शहरभर तुमची चर्चा आहे दर वाढदिवसाला व्हायची ना तशीच पण आता त्या चर्चांना दुःखाची किनार दिसतेय. तुम्ही माय माऊली मानून ज्यांची सेवा केली त्या माता भगिनी हळव्या होऊन तुमची आठवण काढत आहेत, असंख्य लोकं डोळ्यातील अश्रूंतून तुम्हाला आदरांजली अर्पण करत आहेत. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढलेला प्रत्येक कार्यकर्ता आज हमसून हमसून रडताना, तुमच्या आठवणीत रमताना दिसतोय. दर वर्षी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते विविध कार्यक्रम आयोजित करत असतात, आज तुम्ही नाहीत पण शहरात आजही विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तुमच्या जन्मदिनी भरलेलं मैदान मात्र आज तुमच्या आठवणी आणि कार्यकर्त्यांच्या अश्रूंनीच भरलेलं दिसलं. काल दिवसभर तुमच्या स्मृतिस्थळावर येणाऱ्या लोकांच्या नजरेत तुम्हीच दिसत होता येणारा प्रत्येकजण अश्रूभरल्या नयनांनी तुमच्या स्मृती स्थळी नतमस्तक होत होता. आज खरचं हे सर्व पाहून वाटलं की तुमच्यासोबत आयुष्य मिळालं हे माझं केवढं मोठं भाग्य !

सकाळी तुमच्या फोटोसमोर नतमस्तक झाले तेव्हा अश्रूंना वाट करून दिली. तुम्ही तुमच्या संस्कारांनी घडवलेली आपली खंबीर लेक, जिने आजवर मला नेहमीच खंबीर राहायला शिकवल तिच्या दुःखाचा बांध देखिल आज फुटला. शेवटी लेकचं ती. तुमचं दर्शन घेऊन घराबाहेर पडलो तेव्हा चालताना प्रत्येक पावलावर तुम्ही जोडलेला एक एक माणूस आमच्याशी जोडला गेला. जड अंतःकरणाने तुमच्या स्मृतीस्थळाकडे वाटचालत असताना तुमचा अभिमान आणि तुम्ही नसल्याची जाणीव या संमिश्र भावना मनात दाटत होत्या. येणारा प्रत्येक जण तुमच्या आठवणींनी हळवं होऊन आम्हाला धीर देत होता. सोबत •असलेली जनता हीच खरी संपत्ती असे तुम्ही नेहमी सांगायचा आज ही तुम्ही कमावलेली संपत्ती पाहून तुमचा प्रत्येक शब्द पुन्हा आठवला.

साहेब तुम्ही आज नाहीत, तुम्ही आम्हाला विचार दिला, संस्कार दिला, जनसेवेचा वारसा दिला सर्वांची आज नव्याने जाण झाली. चिंचवडकर आजही तुमच्या परिवाराकडे आशेने पाहत आहे, मी असेल, शंकरभाऊ असतील किंवा जगताप कुटुंबातील सर्व सदस्य आमच्यात जनता तुम्हाला शोधत आहे. आज या पत्रातून तुम्हाला एक वचन द्यावं अस वाटलं ते म्हणजे तुमचा विस्तारित परिवार आपले चिंचवडकर यांच्यासाठी तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू चिंचवडच्या विकासाचा तुम्ही सुरू केलेला अश्वमेध अखंड अविरत सुरू ठेऊ.

सरतेशेवटी एवढंच सांगेल, तुमची जनता तुमची वाट पाहतेय साहेब परत या.!

-तुमचीच अश्विनी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button