breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“…तोपर्यंत मरून जाल”; खासदार संजय राऊतांच्या आरोपांना चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, कारवाई करण्याची केली मागणी

मुंबई |

अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री तुरुंगात गेले, तेव्हा त्यांच्यापासून त्यांच्या पक्षाच्या लोकांनी हात काढून घेतला. ही तुमची संस्कृती आहे. आमच्या पक्षाच्या लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला तर त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे ही आमची संस्कृती आहे. म्हणून आता देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्या मागे मी आणि पक्ष खंबीरपणे उभे आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेत्यांना दिले.

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या सत्ताकाळात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपाविषयी विचारणा केली. त्यावर आमदार पाटील म्हणाले, “सर्व प्रकरणे गळ्याशी आल्यानंतरच शिवसेनेला सारे कसे आठवते? २७ महिन्याची सत्ता असताना तुम्ही कारवाई का केली नाही? अमोल काळे यांच्यावर कोट्यवधीचे आरोप करण्यापेक्षा तुमचे सरकार आहे. रीतसर गुन्हा दाखल करा. त्यांना फरार जाहीर करून कारवाई सुरू करा. हम करे सो कायदा प्रमाणे मनमानी चालणार नाही. उद्या काळे, सोमय्या, कंबोज हेसुद्धा अब्रुनुकसानीचे दावे दाखल करतील. त्याच्या सुनावणीला उपस्थित राहता राहता तुम्ही मरून जाल.”

किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याबाबत वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, “अशा अनेक बैठका यावर यापूर्वी झाल्या आहेत. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. किरीट सोमय्या अशा धमक्यांना घाबरत नाहीत. त्यांनी तसे बोलूनही दाखवले आहे”. राज्यातील राजकीय पातळी घसरत चालल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. या विधानाशी आपण सहमत आहे, असा उल्लेख करुन आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत. भडकाऊ शब्द वापरले जाणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भडवा हा शब्द महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणात कधीपासून आला? त्या ऐवजी एजंटगिरी सारखे शब्द वापरता येणे शक्य आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची गरज असल्याचा उल्लेख पाटील यांनी केला.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button