breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गुलाबराव पाटलांचा भाजपा कार्यकर्त्यांकडून सत्कार; गिरीश महाजनांसोबत गाडीत बसून गप्पा; चर्चांना उधाण

मुंबई |

राज्यात नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाविकासआघाडी आणि भाजपा यांच्यात लढत पहायला मिळाली. निवडणुकीत भाजपाला चांगलं यश मिळालं असताना दुसरीकडे महाविकासआघाडीला एकत्रित चांगलं यश मिळालं असलं तरी राष्ट्रवादीने मात्र बाजी मारली आहे. शिवसेना मुख्यमंत्री असतानाही चौथ्या क्रमांकावर गेल्याने विरोधक टीका करत आहेत. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत जळगावमधील बोदवड नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पराभवाचा धक्का बसला. यानंतर आता बोदवडमध्ये शिवसेना भाजपाची छुपी युती असल्याची चर्चा रंगली आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली. राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या, तर भाजपाला अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.

निवडणुकीत मतदानाअगोदर शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान निकालानंतर पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. जामनेरमध्ये एकाच गाडीमध्ये बसून दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. गुलाबराव पाटील गिरीश महाजन यांच्या घरी पोहोचले होते. विशेष म्हणजे यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.

  • खडसेंनीही केला होता छुप्या युतीचा आरोप…

एकनाथ खडसे यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेना आणि भाजपाची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. “एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले आहेत. त्यामुळे फक्त राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. ईश्वचिठ्ठीमुळे दुर्दैवाने गेलो नाहीतर बहुमतापर्यंत आलो असतो. पण हा पराभव का झाला याचं चिंतन करण्याची गरज असून आम्ही ते करु,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं होतं.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button