breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

माजी आमदार विलास लांडे यांची भूमिका ‘आयत्या बिळावर नागोबा’…म्हणे बोपखेल पुलाचा प्रश्न मीच सोडवला!

भाजपा आमदार लक्ष्मण जगतापांचा खरा पाठपुरावा अन् माजी आमदारांचा श्रेयासाठी नुसता कांगावा?

पिंपरी । अधिक दिवे
बोपखेल ते खडकी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासाठी भाजपा नेते तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्र सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. उपमहापौर हिरानानी घुले आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा प्रश्न लावून धरला. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना उड्डाणपुलाच्या कामाचा साक्षात्कार झाला आणि राजकीय श्रेय घेण्याच्या प्रयत्नात लांडे ‘आयत्या बिळावर नागोबा’ झाले आहेत काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता २०१५ मध्ये बंद करण्यात आला होता. त्यानंतर २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर मुळा नदीवरील पूल ते खडकीतून जाणारा एलफिस्टन रस्ता ते टँक रस्ता पक्क्या स्वरुपात करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. महापालिकेमार्फत संरक्षण मालमत्ता अधिकारी यांच्याकडे बोपखेलवासीयांसाठी मुळा नदीवरील पूल व पक्का रस्ता बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाने काही अटींवर १६ हजार १२२ चौरस मीटर संरक्षण खात्याची जागा मुळा नदीवरील पुलासाठी महापालिकेकडे हस्तांतर करण्याची तयारी दर्शवली होती.
भाजपा युवा नेते चेतन घुले म्हणाले की, न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ता बंद झाला. त्यावेळी सर्वात प्रथम आमदार लक्ष्मण जगताप यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली होती. पर्रिकर यांच्यासोबत दोनदा बैठक झाली. त्यानंतर निर्मला सितारामन यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्याकाळात पुलासाठी हस्तांतरीत जमिनीच्या मूल्यांकनानुसार तेवढीच जमीन संरक्षण विभागाला राज्य सरकारने उपलब्ध करुन द्यावी, या अटीसह बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पूल बांधण्यास संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यासाठी लागणारे पैसे महापालिका प्रशासनाने अदा करावे, असे सूचवण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य सरकारच्या येरवडा येथील ४ हेक्टर २२ गुंठे भूखंडापैकी २५ कोटी ८१ लाख रुपये इतक्या सममूल्याची ७ हजार ३६७.३ चौरस मीटर इतकी जागा प्रदान करण्यात आली. राज्य सरकारला या जागेचे मूल्य २५ कोटी ८१ लाख रुपये अदा करण्यात आले. यामुळे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या पुलाचे काम ४ जानेवारी २०१९ रोजी सुरू झाले. या सर्व प्रक्रियेत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुढाकार घेतला, अन्य लोकांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, असेही घुले यांनी ‘महाईन्यूज’ शी बोलताना म्हटले आहे.


१५ वर्षांत जमले नाही ते ८ दिवसांत करुन दाखवले? : नगरसेवक विकास डोळस
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आमच्या मनात आदर आणि सन्मान आहे. पण, पवार स्वत: संरक्षण मंत्री होते. २०१४ पूर्वी तब्बल १५ वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आघाडी सरकारची सत्ता होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना ‘रेड झोन’ आणि लष्कराशी संबंधित प्रश्न सोडवता आले नाहीत. आता आठवडाभरापूर्वी पत्र दिले आणि बोपखेल ते खडकी पुलाचा प्रश्न मार्गी लागला, असे सूर काढणाऱ्या नेत्यांनी श्रेयासाठी केविलवाणी धडपड सुरू केली आहे. पुलाच्या कामाला परवानगी पूर्वीच मिळाली होती. मात्र, कोविड काळात काम सुरू झाले नाही. त्यासाठी भाजपाचे स्थानिक नेते पाठपुरावा करीत होते. महापालिकेच्या माध्यमातून पुलाचे काम होणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे मी स्वत: पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आठ दिवसाच्या पाठपुराव्याने माजी आमदार लांडे संरक्षण विभागाशी संबंधित प्रश्न सोडवत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. पण, ‘रेड झोन’चा प्रश्नही आगामी आठ दिवसांत लांडे यांनी मार्गी लावावा, असे आव्हान नगरसेवक विकास डोळस यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button