breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

पाच महत्त्वाची खाती भाजपकडेच, मित्र पक्षांची कोंडी?; एनडीएच्या बैठकीतील सर्वात मोठी बातमी

Nda Meeting : लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर आता सरकार बनवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. इंडिया आघाडीची काल बैठक झाली. यावेळी सरकार बनवण्याबाबतच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काल एनडीए आघाडीची बैठक झाली. या बैठकीत सरकार स्थापन करण्यावर एकमत झालं. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने मोदी सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, आता खरी कसोटी ही खाती वाटपावर होणार आहे. खाती वाटपावरून एनडीएत मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एनडीएच्या बैठकीत खात्यांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपने पाच महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतं. भाजपने तसं मित्र पक्षांनाही सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. गृह, अर्थ, रेल्वे, आणि कृषीसह आणखी एक खातं भाजप आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता आहे. या खात्यातूनच जनतेपर्यंत पोहोचणं शक्य होणार असल्याने भाजपला ही खाती मित्र पक्षांना द्यायची नाहीयेत. तर नीतीश कुमनार यांनी रेल्वेसह दोन मोठी आणि महत्त्वाची खाती भाजपकडे मागितली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नीतीश कुमार यांनी रेल्वे खातं मागितल्यानंतर लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनीही रेल्वे खातं मागितलं आहे. पण त्यांना खते आणि रसायन मंत्रालय दिलं जाण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे खते आणि रसायन खातं होतं. तेच खातं चिराग यांच्याकडे जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

शिंदेंना तीन मंत्रीपदं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक केंद्रीय मंत्रीपद आणि दोन राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे हे मंत्रिपद कुणाला देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे केंद्रीय मंत्री होण्याची शक्यता अधिक आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली आहे. तसेच आयटी मंत्रालय आणि एका राज्यमंत्रीपदाचीही मागणी केली आहे.

खासदारांशी चर्चा करणार 

दरम्यान, नीतीश कुमार यांनी सगळ्या खासदारांना दिल्लीत बोलावलं आहे. नीतीश कुमार आज या खासदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर उद्या संसदीय दलाची बैठकही नीतीश कुमार यांनी बोलावली आहे. त्या आधीच नीतीश कुमार हे खासदारांच्या भावना जाणून घेणार आहेत.

शिंदेंचं स्नेहभोजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आज शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सर्व सहा खासदाराना भेटून त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केले तर त्यांच्या पत्नी सौ. वृषाली शिंदे यांनी त्याना ओवाळून पेढा देऊन त्यांचे तोंड गोड केले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार धैर्यशील माने, खासदार रवींद्र वायकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार संजय मंडलिक, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, आमदार संजय शिरसाट आणि शिवसेना सचिव संजय मोरे हेदेखील उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button