पुण्यातील शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाप्रमुख कार्यालयावर गोळीबार
![Firing at Shiv Sena's Minority Division District Chief's office in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/shivsena-780x470.jpg)
पुणे : शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाप्रमुखाच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची घटना मोहम्मदवाडी येथील सय्यदनगर येथील गल्ली नंबर २२ मध्ये घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तीन जणांनी विरोधात खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आतिक इकबाल शेख (वय ३७, रा. सय्यद नगर, हडपसर), सादिक शेख (वय २५), हुसेन मुस्तफा कादरी (रा. श्रीराम चौक) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी इम्तियाज अफजल हुसेन शेख (वय ३७, रा. नूर मस्जिद शेजारी, सय्यद नगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज शेख हे शिवसेनेचे अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतात. सय्यद नगर येथे त्यांचे जनसंपर्क कार्यालय आहे.
त्यांचे भाऊ इमरान शेख आणि आरोपी शब्बीर कादरी यांची दोन दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी दुचाकीवरून शिवसेनेचा कार्यालयासमोर आले. आतिक शेख याने त्याच्या हातात पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी इम्तियाज शेख यांच्या कार्यालयावर लाथा मारल्या. मुख्य रस्त्यावर येऊन ‘यहा के भाईलोग हम है। हमारे नाद को लगे तो, जान से हाथो बैठोगे’ असे बोलून पिस्तूलमधून गोळी झाडत दहशत निर्माण केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.