FACT CHECK : रुपीनगर-तळवडेतील घारजाई माता मंदिर पाडणार?
वस्तुस्थिती काय आहे? स्थानिक नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय का?
पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने नवीन प्रारुप विकास आराखडा तयार केला आहे. त्यासाठी हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. अद्याप हा आराखडा अंतिम केलेला नाही. पण, आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून विकास आराखड्यावरुन ‘‘कहीं पे निगाहें… कहीपे निशाना…’’ असा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न काही समाजमाध्यमे आणि राजकीय संधीसाधुंनी पिंपरी-चिंचवडकरांशी दिशाभूल करण्याचा विडाच उचलला आहे. नेहमीप्रमाणे ‘महाईन्यूज’ अशा ‘फेक नॅरेटिव्ह’च्या विरोधात ठाम भूमिका घेणार आहे. डीपीबाबत आम्ही दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार आहोतच..!
काही दिवसांपूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये चिखलीतील एका जाहीर कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांनी केलेले वक्तव्य तुम्हाला ज्ञान असेल… महेश लांडगे म्हणाले होते की, ‘‘डीपीबाबत पॉडकास्ट आणि सोशल मीडिया चालवणाऱ्यांचा मेंदू अमेरिकेत प्रदर्शनासाठी ठेवला पाहिजे. ’’ महेश लांडगेंचे हे विधान पिंपरी-चिंचवडकरांनी खरंच ध्यानात घेतले पाहिजे.
कारण, अपूर्ण ज्ञानाच्या आधारे आणि विशिष्ट राजकीय हेतू साध्य करण्यासाठी डीपीबाबत शहरात विषपेरणी केली जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. ती मांडण्यासाठीच हा ‘‘FACT CHECK’’ आहे.
रुपीनगर- तळवडे या भागात ‘रेड झोन’ आढळतो म्हणजे विकासकामे आणि आरक्षणांच्या विकासाला मर्यादा पडतात. त्यातच आता तेथील घारजाई माता मंदिरावरुन 24 मीटर रस्ता आरक्षीत केला आहे. त्यामुळे ‘‘मंदिर पाडण्यात येईल… भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर आता जमीनदोस्त होणार…’’ असा नारा देत स्थानिक नागरिकांना भडकावण्यात येत आहे. अगदी बाबरी पाडल्यानंतर जसा देशव्यापी प्रश्न निर्माण झाला, तशाप्रकारे अगदी बैठका.. मिटिंगा घेवून… लोकांना भुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. टार्गेट कोण… सत्ताधारी भाजपा… आणि याला खतपाणी कोण घालतं आहे… हे सर्वज्ञात आहे.
घारजाई माता मंदिराचा प्रश्न राजकीय मूळीच नाही… आम्ही याबाबत माहिती घेतली. 2008-09 मध्ये झालेल्या मंजुर विकास आराखड्यामध्ये सदर रस्त्याच्या आखणीमध्ये मंदीर बाधित होत आहे. म्हणजे आजपासून 17 वर्षांपूर्वी हा विकासआराखडा मंजूर झाला. त्यामध्ये घागजाई मंदिर बाधित झाले… पण, तो रस्ता शिफ्ट करावा किंवा आरक्षणात बदल करावा… असे तत्कालीन सत्ताधाऱ्यांना वाटले नाही. किंवा त्यामध्ये कोणता बदल झाला नाही. मंजूर डीपीमध्ये बाधित असतानाही भाजपा सत्ताकाळात मंदिरावर कारवाई झाली नाही. मग, आताच भाजपा सरकारमध्ये कारवाई होईल… असे पिल्लू का सोडले जात आहे…तर महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत.
जुना डीपीमध्ये स्पष्ट आहे… ‘T’ म्हणले टेंपल… उल्लेख दिसतो. मंदिर बाधित आहे. जो डीपी 2008-09 मध्ये मंजुर केला आहे. आता नव्या डीपीत ‘M’ असा उल्लेख आढळतो. जुना डीपी आणि नवा डीपी याची तुलनात्मक पाहणी केली. तर मंदिर जिथे आहे, तिथेच दाखवण्यात आले आहे. मग, मंदिर पाडण्यासाठी 80 फूट रस्ता शिफ्ट केला, हा जावईशोध कोणी लावला? कशासाठी लोकांची डोकी भरकवायची आहेत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

घारजाईमाता सुबुद्धी देवो…
आता नव्या डीपीमध्ये पूर्वीच्याच मंजूर डीपीप्रमाणे रस्त्याची आखणी दर्शवण्यात आली आहे. पण, पूर्वीचा रस्ता 80 फूट शिफ्ट केला… असा जावईशोध काही लोकांनी लावला. त्यामुळे हा सर्व प्रकार चर्चेत आला. सदर रस्ता मंजुर विकास योजनेप्रमाणेच कायम केला आहे. मंदिर बाधित व्हावे… म्हणून 80 फूट रस्ता शिफ्ट केला, हा ‘फेक नॅरेटिव्ह’ आहे. वस्तुस्थिती तशी नाही… अशा लोकांना साक्षात घारजाई माता सुबद्धी देवो… असे म्हणावे लागेल. कारण, विकास आराखड्यामध्ये धार्मिक किंवा प्रार्थनास्थळांसाठी आरक्षण नसते.

पिंपरी-चिंचवडकरांसमोर वस्तुस्थिती यावी…
एक संदर्भ या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतो… कुदळवाडी येथे ऐतिहासिक अतिक्रमण कारवाई झाली. त्यावेळी गावठाणातील मंदिरांनाही प्रशासनाने नोटीसा दिल्या होत्या. यावर आमदार महेश लांडगे यांनी घेतलेली भूमिका निश्चितच स्वागतार्ह होती… ‘‘सदर गावांचा समावेश महापालिकेत होण्यापूर्वी आणि ग्रामपंचायत स्थापनेपासून किंवा पूर्वीपासून असलेली मंदिरांना ‘अभय’ द्यावे. ’’ असा आग्रह त्यांनी धरला आणि त्यानुसार पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर एखाद्या मंदिराची विटसुद्धा हालली आहे, असे ऐकिवात नाही. असो… तूर्तास, घागजाई माता मंदिराच्या मुद्यावरुन जे कोणी राजकारण करु पाहात आहेत… ती मंडळी विकास आराखड्याचे वस्तुनिष्ठ आवलोकन करतील आणि पिंपरी-चिंचवडकरांसमोर खरी परिस्थिती मांडतील, अशी अपेक्षा करुयात.





