हरकतींसाठी मुदतवाढ; मतदारयाद्यांवरून महापालिकांबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या प्रारूपात अनेक चुका असल्याचा विरोधकांचा आक्षेप तसेच मुंबईत ११ लाख नावे दुबार असल्याची मुंबई महानगरपालिकेनेच कबुली दिली. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास १० दिवसांची तर हरकती व सूचनांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यानुसार याद्या आता २२ डिसेंबरला जाहीर केल्या जातील.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहेत. या मतदार याद्यांचे प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रनिहाय विभाजन करून त्यानुसार अंतिम यादी तयार करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका आयुक्तांवर निवडणूक आयोगाने सोपविली आहे. त्यानुसार पालिकांनी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले आहेत. विशेषत: विरोधकांच्या मतदारसंघातील प्रभागांमध्ये हे प्रकार केल्याचा आरोप आहे. एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागांत हलविण्यात आली आहेत. एका पत्त्यावर ३५ लोकांची नावे मतदार यादीत असून असे २६ हजार ३१९ पत्ते असून या पत्त्यांवर ८ लाखांहून अधिक मतदार आहेत.
हेही वाचा – युनेस्को मुख्यालयात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
त्याचप्रमाणे ८ लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचा दावा करीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रारूप यादीवर हरकती-सूचना नोंदविण्यासाठीची मुदत वाढविण्याची मागणी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई या महनगरपालिकांमध्येही मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ही मुदतही कमी असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
या सदोष याद्यांवर विरोधकांबरोबरच सत्ताधारी भाजपनेही आक्षेप घेतले आहेत. मतदार याद्यांवरील हरकतींसाठी मुदत १५ दिवसांनी वाढवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती. शिवसेना ठाकरे गट तसेच मनसेनेही अंतिम यादी प्रसिद्ध करण्याबरोबरच हरकती व सूचनांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मतदार याद्यांमध्ये घोळ असून त्यात दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी केली होती.
नवे वेळापत्रक
प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना : ३ डिसेंबर
हरकतींवर प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध करणे : १० डिसेंबर
मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी : १५ डिसेंबर
मतदान केंद्रनिहाय मतदार यादी : २२ डिसेंबर




