breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

संपामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले; आर्थिक विवंचनेतून एसटी चालक चक्क भादरतोय म्हशी…

सोलापुर |

राज्यात अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून अद्याप बहुसंख्य कर्मचारी सेवेत परतले नाहीत. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. अशा आर्थिक विवंचनेतून मार्ग काढताना सोलापुरात एका एसटी कर्मचाऱ्याने चक्क भ्हशी भादरण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. यातून शासनाला खिजविण्याचा अजिबात हेतू नसल्याचेही त्याचे सांगणे आहे.

सोमनाथ बाळासाहेब अवताडे (३३) हे एसटी महामंडळाच्या सोलापूर आगारात गेल्या सहा वर्षांपासून एसटी चालक म्हणून नोकरी करत आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून बहुसंख्य कर्मचारी संपावर ठाम आहेत. या संपात सोमनाथ अवताडे यांचाही सहभाग आहे. पण संप लांबल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मासिक वेतन मिळणे बंद झाले आहे. त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यातून काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्यांसारखा टोकाचा मार्ग पत्करला आहे. काही कर्मचाऱ्यांच्या मुलांनीही आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर सोमनाथ अवताडे यांनी संपात सक्रिय सहभागी होताना स्वतःची आर्थिक ओढाताण होऊ नये म्हणून कमीपणा न बाळगता चक्क म्हशी भादरण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. इतर वेळी ते खासगी वाहनांवर बदली चालक म्हणून काम करत आहेत. आठवड्यात साधारणतः चार दिवस सोमनाथ यांच्याकडे मोकळा वेळ असतो. या फावल्या वेळेत ते म्हशी भादरण्याचे काम करतात. एका म्हशीमागे दीडशे रुपयांचा मोबदला मिळतो. आठवड्यात हजार रूपयांची कमाई होते, असे सोमनाथ यांनी सांगितले.

करोना आणि टाळेबंदीच्या काळात अनेक दिवस एसटी बसेस बंद होत्या. त्याकाळात गावातील वारिक समाजाच्या एका मित्राबरोबर म्हैस भादरण्याचे काम आवडीने शिकले. सोमनाथ यांनी हे काम न लाजता आणि संकोच न बाळगता शिकून घेतले. आजही हे काम पोटासाठी करतो, असे सोमनाथ यांनी नम्रपणे नमूद केले. संपकरी एसटी कर्मचारी म्हशी भादरण्याचे काम करतो म्हणून लोक सहानुभूती दाखवितात. गोपालक मंडळीही त्यांच्या म्हशी भादरण्याच्या कामासाठी जास्त मोबदला देत आहेत. पण आपण ठरलेलाच मोबदला घेतो. आपणांस कोणाची सहानुभूती नको. स्वाभिमानाने जीवन जगायचे आहे. त्यासाठी रोजगाराचे साधन निवडताना लाज बाळगण्याचे कारण नाही, असेही सोमनाथ यांनी सांगितले. सोमनाथ यांच्या घरात वृध्द आई-वडील, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुली आहेत. त्यांच्या उदरनिर्वाह चालविण्याची जबाबदारी सोमनाथवर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button