महापालिका निवडणूक : महत्त्वाची अपडेट
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १३ लाख रुपयांपर्यंत निश्चित!

राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश जारी : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार मतदान?
पिंपरी-चिंचवड | राज्य निवडणूक आयोगाने आगामी नियोजित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्ग महापालिकेत असून, या महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १३ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा : “मी गंभीर दुखापतीतून सावरतो आहे”; श्रेयस अय्यरचा चाहत्यांसाठी खास संदेश
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात महानगरपालिका सदस्य, नगरपरिषद / नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये बृहन्मुंबई महापालिका आणि ‘अ’ वर्गामध्ये येणाऱ्या पुणे व नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. तर ‘ब’ वर्गामध्ये येणाऱ्या पिंपरी चिंचवड, नाशिक व ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा १३ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय ‘क’ वर्गामध्ये येणाऱ्या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर व वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा ११ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली असून, ‘ड’ वर्गामध्ये येणाऱ्या उर्वरित १९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक खर्चाची मर्यादा ९ लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब वेळोवेळी सादर करणे बंधनकारक राहील, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.




