रिक्षावाला वाट बघतो पण आणि वाट लावतो पण..; एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

Eknath Shinde | राज्यातील २४ नगर परिषदांसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. रिक्षावाला वाट बघू शकतो, तर वाट लावूही शकतो, असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसेच, यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला.
एकनाथ शिंदे म्हणाले, की युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, ज्येष्ठांसाठी योजना अशा सगळ्या योजना शासनाने सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना आहे. लाडकी बहीण योजना कुणीही माई का लाल आला तरीही बंद होणार नाही. २१०० रुपयेही आम्ही योग्य वेळी देणार म्हणजे देणार. लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायांवर उभं करणार आहे. लाडकी बहीण लखपती बनवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा माझा शब्द आहे.
हेही वाचा : ‘दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रिक्षा युनियनचं उद्घाटन आनंद दिघेंनी केली होती. राजेंद्र झावरेंनी रिक्षा चालक म्हणून काम केलं. युनियन चालवली. पतसंस्था सुरु केली. रिक्षावाल्याला कुणी कमी लेखू नका. रिक्षावाल्याला ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना आस्मान दाखवलं आहे. जर मी मुख्यमंत्री होऊ शकतो तर कोपरगावचे नगराध्यक्ष राजेंद्र भाऊ का होऊ शकत नाहीत? रिक्षावाला वाट बघतो तसा वेळ आल्यावर वाट लावतो पण. मी राजेंद्र भाऊंना इतकंच सांगेन बिनधास्त लढा तुमच्या पाठिशी तुमचा भाऊ एकनाथ शिंदे उभा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.





