मिशन-PCMC: भाजप-शिवसेना युतीमध्ये उमेदवारांची ‘कमळ’ चिन्हावर लढण्यास पसंती!

मिशन-PCMC: भाजप-शिवसेना युतीमध्ये उमेदवारांची ‘कमळ’ चिन्हावर लढण्यास पसंती!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संभाव्य युतीसाठी शहराच्या राजकारणात हालचाली जोरात सुरू आहेत. मुंबईत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुढील दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती नेमकी किती जागांवर होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, भाजपाला पोषक असलेल्या प्रभागामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला शक्य त्या ठिकाणी ‘कमळ’ चिन्हावर लाढण्याची तयारी आहे. किंबहुना, शिवसेनेच्या काही दिग्गज इच्छुकांनी भाजपाच्या तिकीटावर लढण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे सेना-भाजपा युती झाली तरी ‘कमळ’च्या चिन्हावर शिवसेनेचे उमेदवार काही ठिकाणी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच दोन्ही पक्षांच्या तसेच इतर वरिष्ठ नेत्यांची बैठकीत चर्चा झाली. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबत सखोल आणि निर्णायक चर्चा झाल्याचे समजते, जागावाटपाच्या प्राथमिक धोरणावरही एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘प्रभागनिहाय राजकीय समीकरणे, मागील निवडणुकांतील कामगिरी आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद,’ अशा निकषांचा विचार करून जागावाटपाबाबत सहमती झाल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे निवडणुकीची राजकीय रंगत आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपच्या कोणत्या इच्छुकांचा पत्ता कट ?

युती झाल्यास शिवसेनेच्या वाट्याला किती जागा मिळणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे मताधिक्य जास्त असणाऱ्या प्रभागांतील कोणत्या इच्छुकाचा पत्ता कट होणार, याची चिंता शहर भाजपमध्ये आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याबाबत आम्ही सुरवातीपासूनच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमार्फत भाजपच्या पक्षश्रेष्ठींपुढे मांडण्यात आला आहे. युती करून निवडणूक लढवली तर अधिकाधिक जागा जिंकण्याची आमची क्षमता आणि आत्मविश्वास या दोन्हीबाबत वरिष्ठ नेते ठाम आहेत.
– राजेश वाबळे, महानगरप्रमुख, शिवसेना

 

युती करण्यासंदर्भात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. युतीबाबत आम्हीही अनुकूल आहोत. पुढील दोन दिवसांत युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या जागावाटपाबाबत शिवसेनेच्या नेत्यांची आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल, त्यानुसार आम्ही पूर्ण ताकदीने काम करण्यास तयार आहोत.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप, पिंपरी चिंचवड शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *