breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पावसाचं विघ्न; हेलिकॉप्टर परतलं पुण्याला

पुणे |

राज्यात काही भागात पूर, भूस्खलन आणि पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये आतापर्यंत जवळपास १५० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनांमध्ये ५० हून अधिक लोक जखमीही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, सांगली आणि कोल्हापूरचे हवाई सर्वेक्षण करणार होते. मात्र, कोयनानगर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर साताऱ्यात न उतरता पुण्याला माघारी गेलं आहे. कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टरचं लँण्डिंग होऊ शकलं नाही. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यातून मुंबईला परतणार आहेत. तळीये, चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर जाणार होते. पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार होते. मात्र, कमी दृश्यमानतेमुळे त्यांचा हवाई दौरा रद्द झाला आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दौरा करत आहेत. कोल्हापूरपासून अजित पवार यांच्या दौऱ्याला सुरूवात होणार होती. मात्र, खराब हवामानामुळे अजित पवारांनी सांगलीपासून दौऱ्याला सुरूवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भिलवडी येथील निवारा केंद्राला भेट दिली. भिलवडी पाहणी करत असताना उपमुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण होऊ शकलं नाही. त्यातच कोल्हापूरकडे जाणारे रस्ते बंद असल्यानं अजित पवारांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. जर परिस्थितीत सुधारणा झाली. हेलिकॉप्टर उपलब्ध झालं, तर दुपारनंतर कोल्हापूरला जाण्याचा प्रयत्न करू, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, सांगलीतील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री सांगलीत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर साताऱ्याला रवाना होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button