breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

काँग्रेसच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, असंवेदनशीलतेचा कळस, आता जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

मुंबई : “आजारी असलेले भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने घेतलेला आक्षेप दुर्दैवी आहे. काँग्रेसने असंवेदनशीलतेचा कळस गाठला”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपावर टीकास्त्र डागलं. फडणवीसांच्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. भाजपच्या दोन्ही आमदारांची अतिशय गंभीर शारिरिक परिस्थिती असताना त्यांना पुण्याहून मतदानासाठी बोलावून घेतलं, हीच मोठी असंवेदनशीलता आहे, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान संपायला अगदी ५ मिनिटांची वेळ शिल्लक असताना भाजपचे झुंजार आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला. त्यांची मतपत्रिका दुसऱ्याने मतपेटीत टाकल्याचं काँग्रेसचा आरोप आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्याऐवजी दुसऱ्याने त्यांची मतपत्रिका मतपेटीत टाकल्याने त्यांचं मत बाद करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसची ही मागणी राज्य निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे.

जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

“काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपांचा माझ्याकडे तपशील नाही. त्याविषयी अधिक माहिती नाही. मात्र गंभीर आजारी असतानाही दोन आमदारांना पुण्याहून मुंबईला मतदानासाठी बोलावणं हा खरं तर मोठा असंवेदनशीलपणा आहे”, असा टोला जयंत पाटलांनी फडणवीसांना लगावला. तसंच मविआ वेळकाढूपणा करत असल्याच्या आरोपाला देखील जयंत पाटलांनी उत्तर दिलं. राज्यसभेवेळी रात्री ३ वाजेपर्यंत भाजपने केला तो वेळकाढूपणा नव्हता? असा उलट सवाल त्यांनी भाजपला विचारला.

काँग्रेसचं म्हणणं काय?

कुणी जर आजारी असेल, कुणाला वाचता येत नसेल, मत द्यायला कोणत्याही प्रकारची असमर्थता असेल तर ते अन्य कुणाची मदत घेऊ शकतात, पण त्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिलेले आहेत. त्याच नियमांचं पालन भाजपकडून झालेलं नाही. जर दोन्ही उमेदवार आपल्या मतपत्रिकेवर सही करु शकतात तर मग आपली मतपत्रिका मतपेटीत का टाकू शकत नाही, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.

भाजपचं म्हणणं काय?

सगळ्या नियमांचं पालन करुन तसेच रिटर्निंग ऑफिसरच्या परवानगीने संबंधितांनी मतदान केलं आहे. काँग्रेसचा घेतलेला आक्षेप तकलादू आहे. त्यांना पराभव दिसतोय, ते नक्कीच तोंडावर आपटतील. यांना विनाशकाले विपरीत बुद्धी आलेली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या पक्षनिष्ठेला सॅल्यूट करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या आक्षेपानंतर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button