मुंबईतील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी ‘पाताल लोक’ प्रकल्प; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

मुंबई | मुंबईतील गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सरकार अनेक मोठे प्रकल्प राबवत असून, त्यात भुयारी मार्ग, नवीन रस्ते आणि मेट्रो नेटवर्कचा विस्तार यांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपाच्या ‘युथ कनेक्ट’ मोहिमेअंतर्गत वरळी येथील एनएससीआय डोममध्ये त्यांनी मुंबईतील तरुणांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ६० टक्के मुंबई ही पश्चिम द्रुतगती महामार्गावरून धावते. त्यावरील भार कमी होत नाही तोवर मुंबईला कोणीच वाहतूक कोंडीतून बाहेर काढू शकणार नाही. त्यामुळे आम्ही या रस्त्याला समांतर रस्ते बांधत आहोत. सध्या मुंबईचा सरासरी वेग हा २० किमी प्रतितास इतका आहे. सकाळी व संध्याकाळी हाच वेग १५ किमी प्रतितास इतका असतो. त्यामुळे आम्ही असे रस्ते बांधत आहोत जिथे तुम्ही ८० किमी प्रति तास इतक्या वेगाने वाहनं चालवू शकता. ८० पेक्षा कमी वेग चालणार नाही. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल.
आम्ही ठाणे ते बोरीवली असा भूयारी मार्ग तयार करत आहोत. तसेच मुलुंड-गोरेगाव असा आणखी एक भूयारी मार्ग बांधणार आहोत. यामुळे मुंबईची पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी आणखी सुलभ होईल. पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असा बोरीवली ते गोरेगावदरम्यान आम्ही आणखी एक रस्ता बांधत आहोत. तर, अटल सेतूला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी असा पूल बांधत आहोत. यामुळे उपनगरांमधील लोक कोस्टल रोडने थेट नवी मुंबई विमानतळावर पोहोचतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : …नाहीतर कार्यक्रमाला येऊ नका; गौतमी पाटील संतापली
दुसऱ्या बाजूला, ईस्टर्न फ्रीवे जिथे संपतो तिथून वाहतूक कोंडी सुरू होते. तिथून पुढे आम्ही भूयारी मार्ग बांधत आहोत. त्याचं काम देखील सुरू केलं आहे. तीन वर्षांमध्ये भूयारी मार्ग पूर्ण तयार झालेला असेल. हा भुयारी मार्ग थेट चौपाटीपर्यंत जाईल. परिणामी वाहतुक कोंडी संपेल. यासाठी आम्ही काम सुरू केलं आहे. तसेच वांद्रे-वरळी सी लिंकने वांद्रे येथे पोहोचल्यावर तिथून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी आणखी एक भूयारी मार्ग विकसित करत आहोत. यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी दूर होईल. तोच भूयारी मार्ग पुढे विमानतळापर्यंत नेणार आहोत. यामुळे दक्षिण मुंबईवरून विमानतळावर पोहोचण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त २० मिनिटे लागतील, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आम्ही एक योजना आखली आहे. आम्ही मुंबईत पाताल लोक तयार करत आहोत. मुंबईत भूयारी मार्गांचं जाळं तयार केलं जाईल. वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांना समांतर रस्ते आणि भूयारी मार्ग तयार केले जातील. ज्यामुळे मुंबई वाहतूक कोंडीमुक्त होईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.




