breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

ललित पाटील प्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण; म्हणाले..

नागपूर : अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यास पोलिसांनीच मदत केल्याचं समोर आलं आहे. यावर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. त्यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या पानटपऱ्यांवर अमली पदार्थ विकले जातात. त्यामुळे अशा २,२०० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच बंद कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सपासून ड्रग्स बनवले जात असल्याची माहिती मिळाल्यावर तिथेही धाडी टाकण्यात आल्या. पूर्वी आपण कढईत गुळ तयार करायचो तसे आता अमली पदार्थ बनवले जात आहेत.

हेही वाचा  –  युवा संघर्ष यात्रेवरील पोलिसांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महिला आक्रमक 

ललित पाटील एक गुन्हेगार आहे. त्याची विश्वासार्हता काय? तसेच त्याला ज्यांनी मदत केली अशा चार पोलिसांना कलम ३११ अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. अमली पदार्थांशी संबंधित थेट सहभाग असलेल्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा १० पोलिसांना बडतर्फ करण्यात आलं आहे. पोलीस आता केवळ अमली पदार्थ खरेदी करणारे आणि विकणाऱ्यांवरच कारवाई करत नाहीत, तर विक्रेत्यांची साखळी शोधून संपूर्ण रॅकेटवर कारवाई करत आहेत. तसेच यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्यासाठी विशेष कायदा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

समाजमाध्यमांद्वारे जसे की इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अमली पदार्थाची तस्करी केली जात आहे. तसेच गुगल पेसारख्या यूपीआय पेमेंट अ‍ॅपद्वारे पैसे देणं आणि कुरीअर एजन्सींच्या माध्यमातून अमली पदार्थांची डिलीव्हरी करणं असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे आम्ही कुरीअर एजन्सींना एक नियमावली पाठवली आहे. तसेच त्यांच्याकडे असं कुठलंही पॅकेज सापडलं तर सर्वस्वी जबाबदारी त्यांची असेल, असंही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कुरीअर एजन्सींना त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पॅकेजची पडताळणी करून पाहावी लागेल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button