पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले सपत्नीक मतदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/IMG_20220102_180933.jpg)
पुणे | प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. रविवारी (दि. 2) बँकेचे मतदान झाले. पुणे जिल्हा बँकेच्या 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या असून सहा जागांसाठी मतदान झाले. हवेली तालुक्यात एक मैत्रीपूर्ण लढत झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.
पुणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) 13, ब मतदार संघ, क मतदार संघ, ड मतदार संघ, अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी, विभक्त जाती व प्रजाती प्रत्येकी एक, महिला प्रतिनिधी दोन अशा 21 जागा आहेत.
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.
मागील निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्हा बँकेच्या सर्व जागा (21 जागा) होत्या. यंदाच्या निवडणुकीत आतापर्यंत 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर हवेली तालुक्यात एक मैत्रीपूर्ण लढत झाली. उर्वरित 6 जागांसाठी रविवारी मतदान झाले. या सहाही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार उभे होते.
प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप बिनविरोध निवडून आले. आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील, “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज एक जबाबदार नागरिक म्हणून सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. pic.twitter.com/30b0NQGP1Q
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 2, 2022