Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

अशांत मणिपूरमध्ये ‘‘लोकशाही’’ : नवे मुख्यमंत्री युमनान खेमचंद सिंग

राष्ट्रपती राजवट रद्द : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची घोषणा

नवी दिल्ली : मणिपूर राज्यातील राष्ट्रपती राजवट मंगळवारी तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली. भाजपने युमनाम खेमचंद सिंग यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. “राज्यात शांतता, सलोखा आणि घटनात्मक व्यवस्था प्रस्थापित होईल,” असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. दीर्घकाळ चाललेल्या जातीय हिंसाचारानंतर राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारने मंगळवारी मणिपूर राज्यातील राष्ट्रपती राजवट तत्काळ प्रभावाने रद्द केल्याची अधिसूचना जारी केली. गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या गॅझेट अधिसूचनेनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम ३५६(२) अंतर्गत मणिपूरसाठी लागू केलेली राष्ट्रपती राजवट मागे घेतली आहे. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता ४ फेब्रुवारी २०२६ पासून ती रद्द करण्यात आल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

माजी मुख्यमंत्री एन. बिरें सिंग यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राजीनामा दिल्यानंतर, राज्यातील दीर्घकालीन जातीय हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ३ मे २०२३ पासून मणिपूरमध्ये मैतेई आणि कूकी-झोमी समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० हजारांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. रोजगार आरक्षण, जमीन हक्क आणि आर्थिक सवलती या मुद्द्यांवरून तणाव तीव्र झाला होता.

दरम्यान, ३ जानेवारी रोजी मणिपूरचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले अजय कुमार भल्ला विविध समाजघटकांशी संवाद साधून राज्यात शांतता आणि सामान्य स्थिती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

युमनाम खेमचंद सिंग नवे मुख्यमंत्री…

दरम्यान, भाजपाने मंगळवारी मणिपूर विधानसभेच्या पक्षनेतेपदी दोन वेळा आमदार राहिलेले युमनाम खेमचंद सिंग यांची निवड केल्याची घोषणा केली. ते राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. भाजप आमदारांची बैठक दिल्लीत पार पडली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. खेमचंद सिंग यांचा शपथविधी मंगळवारीच होणार आहे.खेमचंद सिंग यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यापैकी एक कूकी-झो समुदायातून आणि दुसरे नागा समुदायातून असतील. कांगपोकपीचे आमदार नेमचा किपगेन यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाजपची सहयोगी पक्ष नागा पीपल्स फ्रंट लवकरच नागा समुदायातील उपमुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करणार आहे. ६२ वर्षीय खेमचंद सिंग हे मैतेई समाजातील असून व्यवसायाने अभियंता आहेत. याआधी बिरें सिंग सरकारमध्ये त्यांनी नगर प्रशासन मंत्री म्हणून काम पाहिले होते. २०२२ मध्येही ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

“मणिपूरमध्ये लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू होत असून, राज्यात शांतता, सलोखा आणि घटनात्मक व्यवस्था प्रस्थापित होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. केंद्र सरकार आणि राज्य प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व विकासासाठी कटिबद्ध आहे.
– श्रीमती द्रौपदी मूर्मू, राष्ट्रपती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button