‘उद्धव ठाकरेंनी माविआत जाण्याची चूक मोदींसमोर मान्य केली होती’; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी, आजही नेतृत्व मान्य करु
![Deepak Kesarkar said that Uddhav Thackeray had admitted to Modi the mistake of going to Maviat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/uddhav-thackeray-and-deepak-kesarkar-780x470.jpg)
मुंबई : तुम्ही स्वत: पंतप्रधान महोदयांच्या समोर कबूल केलेलं होतं की, काँग्रेस, राष्ट्रावादीबरोबर जाण्याची तुमच्याकडून चूक झाली, हिंदुत्वाचा विचार सोडण्यात तुमची चूक झालेली आहे, असं म्हणत शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
कोकणी जनतेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अन्याय करणार असेल आणि तुम्ही त्याकडे डोळेझाक करणार असाल तर मग आम्हाला जनतेबरोबर उभं राहायला लागेल. कोणाला खोके खोके म्हणता, खोक्याबरोबर खेळायची आदित्य ठाकरेंना लहानपणापासून सवय असेल. आम्हाला खोक्याबरोबर खेळायची सवय नाही. आम्ही जनतेबरोबर राहिलो म्हणून आमदार झालो. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून आम्ही आमदार झालो.
दिल्लीत मोदींना भेटून आल्यानंतर महाराष्ट्रात गेल्याबरोबर मी हे दुरुस्त करेन, असं आश्वासन देऊन तुम्ही इथे आलात. परंतु इथे आल्यानंतर तुम्ही तो शब्द मोडलेला असेल, तर कोणी कोणाला फसवलं हे महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा समजलं पाहिजे, असं मला वाटतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना फसवलेलं आहे. तुम्हाला फसवलं मग त्याचा दोष दुसऱ्यांवर का टाकता?, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे आमच्यावर खोके घेतल्याचे आरोप करतात. मात्र, आदित्य ठाकरे यांनाच लहानपणापासून खोक्यांशी खेळण्याची सवय आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना पुन्हा पुन्हा सांगितलं, आजसुद्धा तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरची आघाडी तोडा, आम्ही सर्व जण तुमच्याबरोबर आहोत. त्याच्यामुळे कोणीही तुम्हाला फसवलेलं नाही. उलट तुम्ही स्वतःहून सांगितलं की, तुम्ही सगळे जण निघून जा आणि आता जनतेला उलटं सांगताय हे चुकीचं आहे. जनतेला वस्तुस्थिती सांगा, असं दीपक केसरकर म्हणाले.