‘‘प्रधानमंत्री आवास’’ लाभार्थींना सदनिकांचा ताबा देण्यासाठी ‘डेडलाईन’
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक
![Deadline for giving possession of flats to Prime Minister Awas beneficiaries](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/mahesh-landge-780x470.jpg)
आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून कालबद्ध नियोजनाचे आश्वासन
पिंपरी । प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघातील चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांचा ताबा संबंधित लाभार्थींना मिळवा. या करिता महापालिका प्रशासनाला ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. तत्पूर्वी, सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावी, अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.
‘‘सर्वांसाठी घर’’ या संकल्पनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘प्रधानमंत्री आवास योजना’’ देशभरात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. कोविड, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राज्यातील आणि शहरातील बदललेली राजकीय समिकरणे यामुळे प्रकल्प रेंगळला होता. मात्र, शिंदे फडणवीस सरकारच्या काळात आमदार लांडगे यांनी या प्रकल्पासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे योजनेबाबत शहरवासीयांमध्ये नकारात्मक संदेश जात आहे. त्यामुळे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी लाभार्थी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह शहर अभियंता रामदास तांबे, सहायक आयुक्त अण्णा बोदाडे यांच्यासह लाभार्थींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा – सरकारची मोठी घोषणा! सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सना ५ लाखांपर्यंत मिळणार जाहिरात
आमदार लांडगे म्हणाले की, भोसरी विधानसभा मतदार संघांतर्गत चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी येथे प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. प्रशासनाने लाभार्थी निश्चित केले आहेत. त्यांचे कर्ज मंजूर झाले आहे. अनामत रक्कम लाभार्थींनी भरलेली आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थींना सदनिकांचा ताबा मिळणे अपेक्षीत होते. मात्र, काही तांत्रिक अडचणी आणि काहीअंशी अपूर्ण कामामुळे सदनिकांचा ताबा दिला जात नाही. त्यामुळे लाभार्थींमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करावी आणि लाभार्थींना सदनिकांचा ताबा देण्यात यावा.
बैठकीत झालेले निर्णय पुढीलप्रमाणे :
- बोऱ्हाडेवाडी प्रकल्प: दि. 31 जुलै 2023 रोजी काम पूर्ण करुन लाभार्थ्यांना घरे ताब्यात देणे.
- चऱ्होली प्रकल्प: योजनेतील 4 इमारतीचे काम लवकर पूर्ण करून दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी काम पूर्ण करुन लाभार्थ्यांना घरे ताब्यात देणे. (इमारत क्रमांक-1,5,6,7)
- इमारत क्रमांक 2 आणि 3 दि. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत काम पूर्ण करुन ताबा देणे.
- क्रमांक 4 इमारतीचा 31डिसेंबर 2023 रोजी ताबा देणे.
- दि. 11 जुलै 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता बोऱ्हाडेवाडी येथे आणि सायंकाळी 5.30 वाजता चऱ्होली येथे आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह पाहणी करणार आहेत.
चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचे काम पाहणारे प्रधानमंत्री आवास योजनेचे संबंधित अधिकारी, लाथार्थींचे शिष्टमंडळ यांच्याशी बैठक झाली. त्यानुसार, गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या घरांचा ताबा निर्धारित वेळेत मिळावा आणि प्रशासनाबाबत नकारात्मक वातावरण निर्माण होवू नये, यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना केली आहे. आयुक्त आणि प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, निर्धारित वेळेत सदनिकांचा ताबा संबंधित लाभार्थींना देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.