#CoronaVirus: गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचे OSD कोरोना पॉझिटिव्ह, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही संपर्कात
कोल्हापूर: राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयातील विशेष अधिकाऱ्याला (OSD) कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. त्यांना उपचारासाठी कदमवाडी परिसरातील डॉक्टर डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मागील 15 दिवसांमध्ये संबंधित अधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्व बैठकांमध्ये उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांच्या तपासणी केल्या जात आहेत.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयातील अनेक लोक संबंधित अधिकाऱ्याच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांच्याही तपासण्या करण्यात येत आहेत. या सर्वाचे स्वॅब नमुने घेण्यात आलेले आहेत. मात्र, त्याचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. हे अहवाल आल्यानंतरच त्यांच्या संपर्कातील किती जणांना कोरोना संसर्ग झालाय हे स्पष्ट होणार आहे. समर्थकांकडून सतेज पाटील यांच्या आरोग्याविषयी देखील काळजी व्यक्त केली जात आहे.