काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसमध्ये खळबळ, ऐन निवडणुकीत समीकरण बिघडलं
मुंबई : राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. प्रमुख पक्षांचे नेते बैठकांवर बैठका घेत आहे. आगामी निवडणुकीची रणनीती ठरवली जात आहे. काही महानगर पालिकांमध्ये उमेदवारांच्या नावांचीही घोषणा झालेली आहे. त्यामुळे बरेच इच्छुक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. अशातच आता लातूर मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अनेक माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ताकद वाढली आहे. लातूरमधील कोणत्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची भाजपमध्ये प्रवेश
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. लातूर महानगर पालिका जिंकण्याच्या उद्देशाने भाजपात जोरदार इनकमिंग झाले आहे. काँग्रेसच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपाची वाट धरली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक रविशंकर जाधव, पुनीत पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते हरिश्चंद्र जाधव ,अशोक देदे, गनिमीकावा संघटनेचे लक्ष्मीकांत जोगदंड यांनीही भजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपला बळकटी मिळाली आहे. आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – मुंबईत युतीसाठी जयंत पाटलांची उद्धव ठाकरेंबरोबर खलबतं; म्हणाले, “बरीच चर्चा झाली, पण…”
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकेसाठी 15 जानेवारी 2025 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. लातूर महानगरपालिकेच्या 18 प्रभागांतील 70 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. सध्या अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक पक्षातील नाराज नेते आणि पदाधिकारी पक्षांतर करण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत
दरम्यान, 2011 साली लातूर नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले होते. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली होती. तर दुसऱ्या निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे यंदाही या दोन्ही पक्षांमध्ये सत्तेसाठी चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यामुळे यंदाच्या निवडणुकीचे समीकरण बदलले आहे. काँग्रेस थोडी कमकुवत झालेली आहे, त्यामुळे आता लातूरकर कुणाच्या गळ्यात सत्तेची माळ टाकतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




