Chinchwad Vidhansabha By-poll Election: राष्ट्रवादीने अर्ज माघारी घ्यावा, मीही माघार घेतो : राहुल कलाटे
![Chinchwad Vidhansabha By-poll Election: NCP should withdraw application, I also withdraw: Rahul Kalate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Rahul-Kalate-Chinchwad-780x470.jpg)
निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझीही इच्छा
ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर कलाटेंच्या भेटीला
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला उमेदवार मागे घ्यावा. मीसुद्धा ही निवडणूक बिनविरोध करतो, अशी भूमिका अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी घेतली आहे.
चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केली होती. त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन केले होते. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले होते.
महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी अर्ज भरला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर दावा करणारे राहुल कलाटे यांनी थेट आव्हान देत अपक्ष अर्ज भरला होता. दरम्यान, अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राहुल कलाटे यांना केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांनी राहुल कलाटे यांच्याशी फोनवर चर्चा केली असून ते उद्या सकाळी त्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे कलाटे काय निर्णय घेणार? याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे. शुक्रवार, दि. १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक त्रिशंकू होणार की बिनविरोध याचा फैसला होणार आहे.
जनाधार माझ्या पाठीशी : कलाटे
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राहुल कलाटे म्हणाले की, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात २०१९ मध्ये कोणी लढण्यास तयार नव्हते. त्यावेळी मी निवडणूक लढवली. जनाधार माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी प्रमुख दावेदार होतो. सर्व पक्ष निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका घेवून आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवण्याची तयारी करण्यात आली. त्यामुळे मीसुद्धा लढणार आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार मागे घेत असेल, तर मीसुद्धा अर्ज मागे घ्यायला तयार आहे.
अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष…
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंचवड पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संपर्क प्रमुख सचिन आहेर राहुल कलाटे यांची भेट घेणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप घेवून आहेर पिंपरी-चिंचवडमध्ये येणार आहेत. कलाटे यांनी माघार घ्यावी, असे आवाहन करण्यात येणार आहे. पण, राष्ट्रवादीने माघार घ्यावी, मग मीसुद्धा माघार घेतो, असा काहीसा पवित्रा कलाटे यांनी घेतला आहे. कलाटे यांनी अर्ज माघारी न घेतल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसणार आहे. ही बाब महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राष्ट्रवादीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध दिल्यास मीही विचार करेल. काही दिवसांपूर्वी बिनविरोध पोटनिवडणूक होईल, असे वाटत होते. तेव्हा ‘मी वेट अँड वॉच’च्या भूमिकेत होतो. परंतु, निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडी पुढे आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचे ठरवले. पुढे ते म्हणाले की, सचिन अहिर हे उद्या भेटणार आहेत. बहुदा त्यांना उद्धव ठाकरे यांनी सांगितले असावे.
– राहुल कलाटे, अपक्ष उमेदवार.