पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; सखोल चौकशी करण्याचे आदेश

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले आहे. पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमीडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात जमीन खरेदी केली आहे. हा व्यवहार वादात सापडला आहे कारण, अंदाजे १,८०४ कोटी रुपये इतका बाजारभाव असलेली ४० एकर जमीन कंपनीने केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे.
याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवर आरोप केल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरकारी नियमांना पायदळी तुडवत पार्थ पवारांनी जमीन खरेदी केल्याप्रकरणी विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीवर झालेल्या गंभीर आरोपांची गांभीर्याने दखल घेतली आहे. या जमीन खरेदी व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितले. फडणवीस यांनी सांगितले की, “या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, लँड रेकॉर्ड, आयजीआर यांच्याकडून माहिती मागवली आहे. यासंदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश मी दिले आहेत. यासंदर्भातील माहिती आणि प्राथमिक चौकशी याच्या आधारावर यासंदर्भात मी माहिती देईल. अद्याप याबाबत सर्व माहिती आली नाही. पण जे मुद्दे समोर येतात ते मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे त्याची योग्यप्रकारची माहिती घेऊनच बोलले पाहिजे”
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं, वर्ल्ड चॅम्पियन महिला संघाचा ‘असा’ केला सन्मान
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “ही सर्व माहिती आज माझ्याकडे येईल. ही माहिती आल्यानंतर यासंदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे आणि याच्यामध्ये काय कारवाई करण्यात येतील, त्यानंतर या सर्व गोष्टी सांगण्यात येतील. मात्र उपमुख्यमंत्री अशा कुठल्याही प्रकाराला पाठिशी घातलतील असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. कुठेही अनियमितता असेल तर ते पडताळून पाहिले जाईल. अनियमितता असेल तर कडक कारवाई होईल
दरम्यान, याप्रकरणावर पार्थ पवार यांनी आपण कोणतेही चुकीचे काम केले नाही किंवा घोटाळा केला नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र सध्या तरी या जमिनीच्या व्यवहारावरुन राज्यातील राजकीय वातावरणा चांगलेच तापल्याचे दिसत आहे.




