ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाची बैठक

महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जोरदार हालचाली, बैठकांचं सत्र

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत महत्त्वाची रणनीती आखली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरु आहे. या बैठकीत विधानसभेची पूर्वतयारी आणि रणनीती आखली जात आहे. एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. शिंदे गटाकडून आज 100 विधानसभेच्या जागांसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभेच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. शिवसेना महायुतीत किती जागा लढणार? याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

या बैठकीला सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण 100 विधानसभा लढवूयात, अशी मागणी आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली आहे. लोकसभा निवडणुकीत आपला जो स्ट्राईक रेट राहिला आहे त्या हिशोबाने आपण 100 जागा जिंकू शकतो, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला. त्यामुळे शिंदे गटाकडून 100 विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासोबतच प्रभारींची देखील नेमणूक करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सूचना काय?
सरकारी योजना सगळीकडे प्रसारित करा. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जारी केलेल्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे. सदस्य नोंदणीवर भर देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडीपदाची देखील नेमणूक करा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाविकास आघाडीचा समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला
महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जोरदार हालचाली घडत आहेत. महाविकास आघाडीच्या गोटातही जागा वाटपासाठी बैठकांचं सत्र सुरु आहे. तसेच महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या आपापल्या पातळीवर वैयक्तिक बैठकाही पार पडत आहेत. ठाकरे गटाची नुकतीच दोन दिवसांपूर्वी मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाविकास आघाडीत समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. यानुसार मविआत जागावाटपाचा 96-96-96 चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button