फलटणच्या मृत महिला डॉक्टरच्या हातावरचं अक्षर तिचंच; मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती..

नागपूर | सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती देत प्राथमिक तपासातील काही महत्त्वाचे निष्कर्ष स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या ही पद्धत योग्य नाही. बहिणींची सुरक्षा करणं आवश्यक आहे. पण दोन गोष्टींची तुलना करणं योग्य नाही. लाडकी बहीण योजना नको पण सुरक्षा द्या वगैरे म्हणणं अयोग्य आहे. अडीच कोटी लाडक्या बहिणींनी ही योजना स्वीकारली आहे. ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करु.
हेही वाचा : सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू गजाआड, आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी
फॉरेन्सिक अहवालानुसार फलटणच्या डॉक्टर महिलेने जे तिच्या हातावर लिहिलं आहे ते तिचं हस्ताक्षर आहे. महिला डॉक्टरचं शारिरीक शोषण करण्यात आलं आहे. लग्नाचं आमीष दाखवणं वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तिचं शोषण केल्याचं स्पष्ट झालं आहे. बदनेप्रमाणेच दुसऱ्या आरोपीनेही महिलेची फसवणूक केली आहे. त्यामुळेच या महिलेने आत्महत्या केली. गळफास लावून हा मृत्यू झाला आहे आणि हातावरचं अक्षर महिलेचं आहे असं स्पष्ट झालं आहे. अनेक गोष्टी या प्रकरणात समोर आल्या. त्याचीही चौकशी करण्यासाठी आपण न्यायाधीशांकडून चौकशी करतो आहोत अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नोकरी किंवा व्यवसाय करतात अशा महिलांच्या दृष्टीने अधिक सजग होण्याची आपल्याला आवश्यकता आहे. फलटणच्या डॉक्टरचे व्हॉट्स अॅप चॅट वगैरे सगळं ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं आहे. तिथे कोण आलं कोण गेलं याचा लेखाजोखाही घेण्यात आला आहे. अशा गुन्ह्यांमध्ये साठ दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करतो. चार्जशीट दाखल करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.




