मनोज जरांगेंच्या वक्तव्यांवरून छगन भुजबळ आक्रमक; म्हणाले..
![Chhagan Bhujbal said that Manoj Jarange is constantly giving threats](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Chhagan-Bhujbal-1-1-780x470.jpg)
मुंबई | मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण देणारे विधेयक आज (२० फेब्रुवारी) राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. दरम्यान, या अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. जरांगे हे सतत धमक्या देतात. त्यांनी मलादेखील धमकी दिली. जरांगेंच्या दादागिरीला लगाम लावणार आहात की नाही? असा सवाल त्यांनी केला.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंचा उल्लेख केला. जरांगे सतत धमक्या देत आहेत. याला टपकावीन, त्याला टपकावीन असे ते म्हणत आहेत. मलादेखील त्यांनी धमक्या दिल्या. हे काय चालू आहे. एवढंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना ते शिव्या देत आहेत. आम्हाला तर ते नेहमीच शिव्या देतात. तिथे बसलेल्या महसूल आयुक्त, एसपी, जिल्हाधिकारी यांनाही आईवरून शिव्या दिल्या जात आहेत. ही दादागिरी चाललेली आहे. त्याला लगाम घालणार आहात की नाही.
हेही वाचा – आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे का? राज ठाकरेंचा सवाल
यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले. छगन भुजबळ यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. त्याची सभागृहाने नोंद घेतलेली आहे. भुजबळ यांना कोणत्याही प्रकारे जीवितहानीची शक्यता वाटत असेल तर त्यांनी ही चिंता व्यक्त करणे रास्त आहे. सभागृहाने याची नोंद घेतली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती उपायोजना करावी, असं राहुल नार्वेकर म्हणाले.