ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत उमेदवार मिळणार नाहीत? चंद्रकांत पाटलांचा दावा

मुंबई | २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३७ जागांसह दणदणीत विजय मिळवला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. या निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची दोन ते तीन वेळा भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. तसेच, आदित्य ठाकरे यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे उद्धव ठाकरे महायुतीत सामील होणार का, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड महिन्यापूर्वी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, उद्धव ठाकरे यांना महायुतीत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका वक्तव्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवले आहे. पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील अभ्यासाची प्रशंसा करताना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. “अमितभाईंनी ५०० पानी पुस्तक स्वतः तयार केलं आहे. छत्रपती शिवरायांवर त्यांनी इतका सखोल अभ्यास केला आहे की, ते वाचून संजय राऊत यांनाही चक्कर येईल,” असा टोला पाटील यांनी लगावला. हे पुस्तक लवकरच पुणे किंवा दिल्लीत प्रकाशित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. “केवळ सत्तेत नसल्याने आणि सामील करून घेतले नाही म्हणून किती दुस्वास करणार?” असा सवालही पाटील यांनी ठाकरे गटाला उद्देशून केला.
हेही वाचा : शेतकऱ्यांना दिवसा 10 तास वीज, महाराष्ट्रात दरवर्षी विजेचे बील कमी होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
चंद्रकांत पाटील यांनी यापुढे जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी एक गंभीर दावा केला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची समजूत घालून किंवा दिल्लीत चर्चा करून महायुतीत सामील झाले नाही, तर त्यांना मुंबईतही उमेदवार मिळणार नाहीत.” पाटील यांनी पुढे अंदाज व्यक्त केला की, “जर ठाकरे महायुतीत आले नाहीत, तर त्यांच्या पक्षाला इतकी गळती लागेल की पुणे, कोल्हापूर सोडा, मुंबईतही त्यांना उमेदवार उभे करता येणार नाहीत.”