“मुस्लीम मुलीला घेऊन या आणि नोकरी मिळवा”; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

Raghvendra Pratap Singh | भाजपा नेते आणि डोमरीयागंजचे माजी आमदार राघवेंद्र प्रताप सिंग यांच्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. “जो हिंदू तरुण मुस्लीम तरुणीला घेऊन येईल, मी त्याच्या नोकरीची तजवीज करेन,” असं आवाहन त्यांनी तरुणांना केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सिंग यांनी तरुणांना उद्देशून म्हटलं, “कमीत कमी १० मुस्लीम मुली उचलून आणा, त्यानंतर तुमच्या नोकरीची आणि संसाराची जबाबदारी माझी. जो मुस्लीम मुलीला घेऊन येईल, त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आम्ही सोडवू.”
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी प्रश्न सुटेपर्यंत ‘बांधकाम बंदी’ ची मागणी
या वक्तव्यावरून मोठं राजकीय वादळ उठलं असून भाजपा पक्षाने या विधानापासून अंतर राखलं आहे. मात्र, पक्षाकडून सुनावणी झाल्यानंतरही राघवेंद्र प्रताप सिंग आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघात मुस्लीम लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील लोकांना असा संदेश देणं आवश्यक होतं.”
राघवेंद्र सिंग यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी राघवेंद्र सिंग यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आणि त्यांनी भाजपा नेतृत्वाकडे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




