Breaking News : काँग्रेसमधील सुमारे ३० पदाधिकारी महेश लांडगेंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश; महाविकास आघाडीला धक्का!
![Breaking News: Around 30 office bearers from Congress join BJP under the leadership of Mahesh Landge; A shock to Mahavikas Aghadi!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/sachin-sathe-pimpri-chinchwad-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेश सचिव सचिन साठे यांनी सुमारे ३० पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्यावर नाराज असलेला मोठा गट भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात दाखल झाल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.
पिंपरी-चिंचवडचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, प्रदेश सचिव सचिन साठे यांनी प्रदेश सचिवपदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. साठे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. त्यामुळे साठे आणि समर्थक पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार, यावर शिक्कामोर्तब झाले होते.
सचिन साठे म्हणाले की, मी 1997 पासून अर्थात माझ्या विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी (यू. आर) होतो. कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू होतो. खेळाडू असताना राजकारणात प्रवेश झाला. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षात काम करण्याचे समाधान मोठे होते. पुढे, एन.एस.यू.आय. चा जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले.
प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदावर काम केले. 2014 ते 2020 या साडे सहा वर्षांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषवले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचा निरीक्षक म्हणून काम केले. सध्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी आहे. अशाप्रकारे काँग्रेसच्या विविध पदांवर आतापर्यंत निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे काम केले. मात्र, जी उपेक्षा अलिकडच्या काळात माझी झाली त्यामुळे, यापुढे काँग्रेसचे काम करण्याची मानसिकता राहिली नाही. तरी स्वखुशीने प्रदेश काँग्रेसचे सचिव पद आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा मी राजीनामा देत आहे, असेही सचिन साठे यांनी म्हटले आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन साठे यांचा राजीमाना काँग्रेससह महाविकास आघाडीला धक्का देणारा आहे.
महाविकास आघाडीवर भाजपाचा पलटवार…
पिंपळे निलख येथील भाजपाचे नाराज माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला. त्यामुळे या भागात महाविकास आघाडीची ताकद वाढल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्याच गावातून प्रतिनिधीत्व करणारे आणि तुल्यबळ काँग्रेसचे सचिन साठे यांना गळाला लावले. त्याद्वारे महाविकास आघाडीला पिंपळे निलख भागात कोंडीत पकडण्यात भाजपा यशस्वी झाली आहे.
मी गेल्या 26 वर्षांपासून निष्ठेने काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. माल, गेल्या काही दिवसांपासून पक्षीय पातळीवर माझी मोठ्या प्रमाणावर घुसमट होत आहे. पक्षाच्या व्यासपीठावर वेळोवेळी अनेक मुद्दे मी मांडले, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शहर पातळीवरील पक्षहितासाठी अनेक विषय उपस्थित केले, त्याचीही दखल घेतली गेली नाही. पक्षाकडून अश्या प्रकारे होणारी माझी उपेक्षा मी सहन करू शकत नाही. अशा परिस्थितीत आपण यापुढे पक्षात थांबणे योग्य नाही, अशी भावना झाल्याने मी स्वखुशीने राजीनामा देत आहे.
– सचिन साठे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/image-44-768x1024.png)