breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

भाजपा आमदार महेश लांडगे यांची ‘नाकाबंदी’ ; लक्ष्मण जगताप यांना ‘सॉफ्टकॉर्नर’

राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीचे  ‘मिशन भोसरी’

चिंचवड मतदार संघात आक्रमक चेहरा मिळाला नाही?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर झाली. या कार्यकारिणीच्या माध्यमातून भोसरी मतदार संघात चार महत्त्वाची पदे देण्यात आली. शहराध्यक्षपदी नगरसेवक अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट आणि युवक भोसरीच्या कार्याध्यक्षपदी राहुल भासले, युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी अशी चारही पदे भोसरी मतदार संघातील आहेत. त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश    लांडगे यांची ‘नाकाबंदी ’होणार आहे.

दुसरीकडे, भाजपाचे दिग्गज नेते आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मात्र राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून ‘सॉफ्टकॉर्नर’ मिळाल्याचे पहायला मिळत आहे. चिंचवड मतदार संघातून कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे यांची पुन:नियुक्ती झाली आहे. तर युवकच्या कार्याध्यक्षपदी प्रसन्न डांगे आणि महिला उज्ज्वला ढोरे यांची निवड केली आहे. यापैकी डांगे आणि ढोरे यांचा प्रभाव फारसा नाही.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण ४६ प्रभागांपैकी १९ प्रभागांचा समावेश असलेल्या पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व आमदार जगताप करतात. त्यामुळे सुमारे ८३ नगरसेवकांचे भवितव्य या दोन मतदार संघातील पक्षसंघटनेवर अवलंबून आहे. भोसरी आणि चिंचवडची तुलना पाहता भोसरीत राष्ट्रवादीने प्रभावी चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे.

अजित गव्हाणे २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार आहेत. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘गुड बॉक्स’मधील असल्याने थेट संपर्कात आहेत. मराठा समाजाचा चेहरा असलेले गव्हाणे भाजपाचे आमदार लांडगे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. तसेच, भोसरी मतदार संघात माळी समाजाचा प्रभाव चांगला आहे. त्यामुळे महिला शहराध्यक्षपदी माळी समाजाच्या कविता आल्हाट यांना जबाबदारी दिली आहे. तसेच, नेहरुनगर आणि परिसरात प्रभाव असलेले मागास समाजातील नगरसेवक राहुल भोसले यांना कार्याध्यक्षपदी संधी देत भोसरी मतदार संघातील जातीय त्रिकोण साधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी केलेला आहे.

याउलट, चिंचवड मतदार संघमध्ये भाजपाचे आमदार जगताप यांना थेट आव्हान देणारे कलाटे, काटे, चिंचवडे, वाघेरे, जगताप आदींना मात्र नव्या कार्यकारिणीतून बाजूला ठेवण्यात आले आहे. कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पुन:नियुक्ती केली आहे. वास्तविक, प्रशांत शितोळे हे आमदार जगताप यांचे पूर्वाश्रमीचे कट्टर समर्थक आहेत. कार्याध्यक्षपदाच्या काळात शितोळे यांनी भाजपावर टीकेचा भडीमार केला. पण, एखादा अपवाद वगळता आमदार जगताप यांच्यावर थेट टिका करण्याचे टाळले आहे. तसेच, २०१९ मध्ये आमदार जगताप यांच्याविरोधात विधानसभा लढवण्याची तयारी केलेली असताना ऐनवेळी निवडणुकीत चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला अधिकृत उमेदवारही मिळाला नाही. अशा परिस्थितीत नव्या कार्यकारिणीची घोषणा करताना आमदार जगताप यांना आव्हान देणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणे अपेक्षीत होते.

…. असा राहील निवडणूक निकालाचा अंदाज

राष्ट्रवादीच्या नव्या कार्याकारिणीचे स्वरुप पाहता पिंपरी आणि चिंचवड मतदार संघात राष्ट्रवादीकडे काहीसा कानाडोळा केलेला दिसतो. त्यामुळे या दोन मतदार संघातील सुमारे ८३ जागांपैकी ४० ते ४५ जागांवर भाजपा आघाडीवर राहील. परंतु, भोसरीतील पूर्वीच्या नगरसेवकांची संख्या २५ ते २७ पर्यंत कमी होईल. पिंपरी आणि चिंचवड मतदार संघात भाजपाचा आमदार लक्ष्मण जगताप यांनी जातीने लक्ष घातले आहे. या दोन मतदार संघातील निवडणुकीच्या निकालावर शहरातील सत्तेचे गणित निश्चित होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सत्तेच्या राजकारणात चिंचवडचे आमदार जगताप ‘किंगमेकर’च्या भूमिकेत दिसतील, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.

महेश लांडगे यांचा संघर्ष कायम…

भोसरीचे आमदार आणि भाजपाचे विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात संघर्षातून पुढे आलेले नेतृत्त्व आहे. २०१७ मध्ये भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप होते. त्यावेळी भाजपाने महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवली. त्यावेळी राष्ट्रवादीविरोधी वातावरण आणि भाजपाचे अनुकूल परिस्थिती असल्याने शहर भाजपाला फायदा झाला. गेल्या पाच वर्षांत राजकीय पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. आताच्या परिस्थितीत भाजपाच्या शहराध्यक्षपदाची सूत्रे महेश लांडगे यांच्या हातात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने लांडगे यांची ‘कोंडी’करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. परिणामी, महेश लांडगे यांना आगामी काळात मोठा संघर्ष करावा लागणार असून, संघर्षातून आपली क्षमता आणि नेतृत्व कौशल्य सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी ‘फिल्डवर’ उतरून लोकांसोबत आणि लोकांसाठी लढण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button