‘भाजपने महाराष्ट्र विधानसभेचा पॅटर्न दिल्लीत राबवला’; संजय राऊतांचा मोठा दावा

Delhi Elections 2025 | दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. आम आदमी पक्ष चौथ्यांदा सत्ता स्थापन करणार असे त्यांचे नेते सांगत होते. मात्र मतमोजणीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. भाजपा स्पष्ट बहुमत प्राप्त करेल, असे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाबद्दल मोठा दावा केला आहे.
संजय राऊत म्हणाले, की मी कालच दिल्लीत राहुल गांधी यांच्याबरोबर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये स्पष्ट केलं होतं की , दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू केला आहे. ज्यापद्धतीने महाराष्ट्रीत विजय मिळवला आणि त्यासाठी लोकशाहीतील घृणास्पद कृत्य महाराष्ट्रात घडवून आणली, त्याला एक्सपोज राहुल गांधी यांनी केले.
हेही वाचा : ‘काही मिळालं नाही की तू गावात जाऊन बसतोस आणि..’; उद्धव ठाकरेंचा शिंदेंना खोचक टोला
लोकसभा आणि विधानसभा यामधील पाच महिन्यांच्या काळात ३९ लाख मते वाढली. प्रौढ मतदारांचा आकडा आहे त्यापेक्षा जास्त मतदान झालं आहे. हे मतदान आलं कुठून. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदारांचा जो आकडा दिला आहे त्यापेक्षा साधारण ४० लाख मतदान जास्त झालं असेल आणि त्याचा हिशोब निवडणूक आयोग देत नाही, मतदार याद्या देत नाही. हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला. याच पॅटर्नने त्यांना महाराष्ट्रात यश मिळालं, असं संजय राऊत म्हणाले.
प्रत्येक मतदारसंघात (महाराष्ट्रातील) १५ ते २० हजार मते वाढवण्यात आले. काल मला विचारण्यात आलं की ही ३९ लाख मतं आली कुठून आणि जाणार कुठे? त्यातील काही बोगस मतदार दिल्लीत वळवले आणि त्यानंतर ३९ लाख मते तशीच्या तशी बिहार निवडणुकात जातील. फॉर्म्युला ठरलेला आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.