मारकडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया स्थगित

Markadwadi Ballot Paper Voting | सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात आज मतपत्रिकेवर पुन्हा मतदान होणार होते. मात्र, पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप केल्यानंतर गावकऱ्यांनी मतदानाचा निर्णय मागे घेतला आहे. माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तर जानकर यांनी या मतदानासाठी पुढाकार घेतला होता, त्यांनीच आता माघार घेण्याची घोषणा केली आहे.
मारकडवाडी या गावातून भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांना अधिकची मते मिळाली, असा आरोप निकालानंतर करण्यात येत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी ईव्हीएमवर संशय घेत, पुन्हा एकदा मतदान घेण्याची मागणी केली होती. त्यामुळेच मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र आज मतदानाबाबतची प्रक्रिया सुरू केल्यानंतर प्रशासनाने यासाठी विरोध केला. तसेच एक जरी मतदान टाकले गेले तर आम्ही मतपेट्या जप्त करू, असेही पोलीस प्रशासनाने सांगितले होते.
हेही वाचा – ‘एकनाथ शिंदेंच्या रूसव्या-फुगव्यामागे दिल्लीतील महाशक्तीचा हात’; संजय राऊतांचं मोठं विधान
मतदान रद्द झाल्यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पोलीस प्रशासनाने जप्तीची कारवाई करणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी आधीच १४४ कलम लागू केले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी चर्चा करून मतदान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस जर मतदानच करू देणार नसतील आणि पेट्या उचलून नेणार असतील तर मतदान करण्याला अर्थ नाही. त्यामुळे आम्ही आगामी दिवसांत हजारो लोकांचा मोर्चा काढून आमचा आवाज पोहोचवण्याच प्रयत्न करू.





