Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर | राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना कायदे निर्मितीची प्रक्रिया, संसदीय पद्धत अभ्यासण्याची संधी प्राप्त होते. अशा प्रशिक्षण प्रबोधनातूनच लोकशाही समृद्ध होते. त्यामुळे प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन हे समृद्ध लोकशाहीची त्रिसुत्री आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विधानपरिषदेने संमत केलेले महत्त्वपूर्ण विधेयके ठराव आणि धोरणे याविषयी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या संदर्भ समृद्ध ग्रंथ मालिकेतील द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते आज विधानपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात झाले.

यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ज्या सभागृहाने १८ वर्ष शिकवीत अनुभवसंपन्न केले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली, अशा सभागृहात कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा येण्याचे भाग्य मिळाले. त्यामुळे या सभागृहातील आठवणींना उजाळा मिळाला. चर्चेद्वारे समोरच्याकडून राज्याच्या विकासासाठी हवे असलेले काढून घेण्याचे कौशल्य याच सभागृहाने दिले. विधानपरिषद सभागृहात कायदा निर्मितीवर झालेल्या चर्चेतून परिणामकारक कायद्यांची निर्मिती झाली आहे. या सभागृहात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना नियमांची लढाई झाली तरी कधी वैयक्तिक संबंधांमध्ये कटूता आली नाही, हीच आपल्या लोकशाहीची समृद्ध परंपरा आहे.

लोकशाहीमध्ये संविधानाने अधिकार व कर्तव्य निश्चित केले आहेत. विकासाची समान संधी यातून निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या श्रेष्ठ परंपरांचे पालन विधिमंडळाने केले आहे. या ग्रंथांमधून सभागृहातील विचारांचा ठेवा नवीन पिढीसमोर येणार आहे. त्यामुळे या ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे, असे आवाहनही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी केले.

हेही वाचा        :            शरद पवार यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा; खासदार निलेश लंके यांची मागणी 

चर्चेअंती निर्मित कायद्यांमध्ये जनमानसाचे प्रतिबिंब दिसते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कायदा निर्मिती प्रक्रियेत सभागृहांमध्ये होत असलेली चर्चा अत्यंत महत्त्वाची असते. अशा चर्चांमधूनच प्रगल्भ कायद्याची निर्मिती होते. चर्चांमधून निर्मित झालेल्या कायद्यांमध्ये जनमानसाचे प्रतिबिंब दिसून येते. अशा कायद्यांचा निश्चितच लोककल्याणासाठी उपयोग होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधानपरिषद सभागृहाचे सदस्य होते. या सभागृहाने अतिशय हुशार, अनुभवी सदस्य दिले आहेत. त्यांच्या हुशारी, अनुभवाचा लाभ कायदा निर्मिती प्रक्रियेत झाला आहे. या सभागृहाने पारित केलेले कायदे, ध्येयधोरणे यावर आधारित ग्रंथसंपदा निर्माण होत आहे. आपल्या सभागृहातील कामकाजाचे ‘रेकॉर्ड’ होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेकॉर्ड नसल्याने अनेक ऐतिहासिक संदर्भाना आपण मुकलो आहोत.

पाश्चिमात्य देशांमध्ये ‘रेकॉर्ड’ असल्यामुळे त्यांचे संदर्भ आपणास घ्यावे लागतात. आपली लोकशाही पद्धत त्यांच्यापेक्षा दोन हजार वर्षांनी जुनी आहे, मात्र रेकॉर्ड नसल्याने संदर्भ उपलब्ध होत नाहीत. इतिहास हा संकलित करावयाचा असतो. त्यामुळे सभागृहातील भाषणे, निर्मित कायदे यांचे संकलन करून प्रकाशित केलेला ग्रंथ हा नेहमी ऐतिहासिक दस्ताऐवज ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्याच्या मागास भागाचा विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 1950 नंतर पहिल्यांदा संविधानात उपलब्ध कलमांचा उपयोग केला. त्यामुळे विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झाले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचा गौरवही केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button