‘शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या २ आमदारांना मारहाण करण्यात आली’; अॅड.असीम सरोदेंचा गंभीर आरोप
मुंबई | धाराशिव येथे रविवारी संध्याकाळी ‘निर्भय बनो’ सभा पार पडली. यावेळी असीम सरोदेंनी शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीमध्ये काय घडलं होतं? यासंदर्भात काही दावे केले आहेत. तसेच, शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख करत गंभीर आरेप केले आहेत. तसेच, यासंदर्भात चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही असीम सरोदेंनी केली आहे.
अॅड.असीम सरोदे म्हणाले की, गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबले होते, तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही खोल्या तिथे बुक केल्या होत्या. त्या हॉटेलशी त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहात होत्या. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही.
हेही वाचा – पुणे शहरात जड वाहनांना बंदी; पिंपरी, मुंबई, सातारा, सोलापुरातून येणाऱ्या वाहनांना बंदी
गुवाहाटीतल्या त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले. ८ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं गेलं. त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.