‘..तर मी भाजपाचा प्रचार करेन’; अरविंद केजरीवाल यांचं विधान चर्चेत
![Arvind Kejriwal said that if electricity is made free in 22 states, I will campaign for BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Arvind-Kejriwal--780x470.jpg)
Arvind Kejriwal | दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी रविवारी छत्रसाल स्टेडियमवर जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, आज मी नरेंद्र मोदींना एक आव्हान देऊ इच्छितो. फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी २२ राज्यांमध्ये वीज मोफत केली तर मी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करेन, असं सूचक विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं.
अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीतलं वातावरण गंभीर आहे. इथल्या रस्त्यांवर दिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटना घडत आहेत. ठिकठिकाणी गुंड्डांनी त्यांचे अड्डे (तळ) बनवले आहेत. ९० च्या दशकात मुंबईची जशी अवस्था होती अगदी तशीच अवस्था आज दिल्लीची करून ठेवली आहे. गुन्ह्यांची कित्येक प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये पोलीस एफआयआर दाखल केले जात नाहीत. सामान्य जनता दिल्लीत सुरक्षित नाही. त्यांचं सुरक्षित जगणं कठीण झालं आहे. दिल्ली पोलीस भाजपासाठी काम करत आहेत.
हेही वाचा – ‘कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल, तयार रहा..’; नीलम गोऱ्हे यांचं अजितदादा गटाबाबत सूचक विधान
राजकारणात यायच्या आधी मी १० वर्षे येथील झोपडपट्ट्यांमध्ये काम केलं आहे. दिल्लीतली बससेवा मोडकळीस आली आहे. एखादी महिला बसमध्ये चढते आणि तिला बसमध्ये जागा मिळत नसल्यामुळे ती उभी राहते. त्यानंतर तिच्याशी कसा व्यवहार होतो? महिला सुरक्षेचा मुद्दा आपल्यासमोर आहेच. याबाबत मी तीन-चार वेळा उपराज्यपालांशी चर्चा केली. त्यांना म्हणालो, बस मार्शलना थांबवू नका, महिला सुरक्षेसाठी मार्शल गरजेचे आहेत. ही सर्व गरीब मुलं आहेत. मार्शल म्हणून काम करतात आणि त्यांना महिन्याला १५ हजार रुपये मिळत होते. मात्र भाजपाने हे सगळं बंद केलं. कारण भाजपा गरीबविरोधी आहे, असंही अरविंद केजरीवाल म्हणाले.