अमित शाहांची शरद पवारांवर टीका, अजित पवार गटाचा आमदार नाराज

पिंपरी | भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. शरद पवार यांच्यावर वारंवार होणाऱ्या टीकेवरून अजित पवार गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे देशाचे नेते असून ते आमचे दैवत आहेत. भाजपाने केलेली टीका योग्य नसल्याचं मत अजित पवारांचे कट्टर समर्थक विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केल आहे.
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते भाजपनेही कबुल केलेलं आहे. भाजपने शरद पवारांचा आदरच केला पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवार हे माझे गुरू आहेत, असं म्हटलं होतं. यावरून भाजप नेते अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ते योग्य नाही, अशी नाराजी अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – विंडशील्डवर FASTag नसल्यास भरावा तब्बल दंड, काय आहे NHAI चा नवा नियम?
अमित शाह यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
पुण्यात भाजपाच्या दोन दिवस राज्य कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम शरद पवार यांनी केलं आहे, असं अमित शाह म्हणाले होते.





