५०० कोटीचे हॉस्पिटल अजितदादांच्या नातेवाईकांना? अंजली दमानियांचा आरोप

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अमेडिया या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर जमीन खरेदी करत असतानाच हे प्रकरण प्रसिद्धीझोतात आलं. यानंतर या प्रकरणातील कथित घोटाळा पुढे आला आणि पार्थ पवारांना हा व्यवहार थांबवावा लागला. मात्र, या व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा दमानिया यांनी अजित पवारांवर आरोप केले आहेत.
मुंबई महापालिकेच्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयावरून दमानिया यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. मुंबई महानगरपालिकेने ५०० कोटी रुपये खर्च करून बांधलेलं शताब्दी रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वानुसार चालवण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने रस दाखवला असल्याची एक बातमी नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केली होती. ही बातमी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
हेही वाचा : चाकणमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र; मनिषा गोरे यांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा
अंजली दमानिया यांनी एक्सवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आता आणखी एक ५०० कोटी रुपयांचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना? शताब्दी हॉस्पिटल हे एक ५८० बेडचे हॉस्पिटल आहे, जे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं बांधलं आहे. विरोध असताना देखील हे रुग्णालय पीपीपी तत्वाने देण्याचा घाट घातला आणि योगायोगाने यात पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने बोली लावली आहे. याच रुग्णालयाच्या जवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक रुग्णालय बांधत आहे आणि हे तयार रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात आहे. मुख्यमंत्री फडणवीसची, तुम्ही एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा.




