देवेंद्र फडणवीसांची पत्र सार्वजनिक का केलं? अजित पवार गटाचा सवाल
![Amol Mitkari said why Devendra Fadnavis' letter was made public](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Devendra-Fadnavis-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई : नवाब मलिकांना सत्तेत सामील करून न घेण्याचं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एक खळबळ उडाली आहे. यावरून अजित पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र सार्वजनिक करायची गरज नव्हती, असं अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, विधान परिषदेत नवाब मलिक यांचा प्रश्न निघाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. मुळात हे पत्र सार्वजनिक करण्याची गरज नव्हती. त्यांनी अधिवेशन संपल्यानंतर जर अजित पवार यांना सांगितला असता तर नवाब मलिक हा विषय आलाच नसता. महायुतीत बिघाड होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. त्याबाबच चिंतन देखील करायला हवं.
हेही वाचा – नवाब मलिकांवरून सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला; म्हणाल्या..
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे पत्र न लिहिता अजित पवारांना फोन करुनही सांगू शकत होते. त्यामुळे हे सगळं षडयंत्र असल्याची शंका येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली. राष्ट्रवादीचे नेते जेलमध्ये होते तेव्हा मी सर्वांना भेटले. अडचणीच्या काळात सोबत राहावं लागतं. प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत होतो. नवाब मलिकांवर माझा पूर्ण विश्वास असून त्यांच्या मागे सुप्रिया सुळे पूर्ण ताकदीने उभी राहिल, असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.