निधीवाटपावरून अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ५० कोटी..
![Ambadas Danve will attack the government over the allocation of funds](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Ambadas-Danve-780x470.jpg)
मुंबई : वित्तमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शिंदे गटातील बंडोखोर आमदारांनी भरघोस निधी दिला आहे. आमदारांना करण्यात आलेल्या निधी वाटपावरून विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारला धारेवर धरलं आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानेवे चांगलेच आक्रमक झाले आहेत.
अंबादास दानवे म्हणाले, विधानपरिषद आणि विधानसभेतील आमदारांना असमान निधीचं वाटप झालं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील कामांची स्थगिती उठवली नाही. नवीन निधी मिळणे फार लांब राहिलं. आमदारांना दिला जाणारा निधी हा जनतेच्या करातून दिला जातो. हा निधी काय सरकारची मालकी नाही. ज्या आमदारांना निधी दिला नाही, तेथील जनता कर भरत नाही का? त्यांना विकासाचा अधिकार नाही का? असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा – Jayant Sawarkar : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं वयाच्या ८८ वर्षी निधन
असमान निधीचं वाटप निषेधार्य आहे. तेथील जनतेवर आणि आमदारांवर अन्याय आहे. एखाद्याला ५० कोटी, तर दुसऱ्याला ६० कोटी रूपयांचा निधी दिला जातो. पण, एखाद्याला २ कोटी रूपयांचा सुद्धा निधी मिळत नाही. त्यामुळे सरकारने आमदारांना समान निधी दिला पाहिजे. मात्र, द्यायचेच नाही ही भूमीका मागील काळात घेतली गेली. भाजपाच्या आमदारांना २० कोटी, शिंदे गटाच्या आमदारांना ४० कोटी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना ५० कोटी रूपयांचा निधी दिला गेला, असाही आरोप अंबादास दानवेंनी केला आहे.
मी दाव्यासहीत सांगेन की, ५० कोटी रूपयांचे फोन आले आहेत. मला कोणी कोणत्या नंबरवरून फोन केला, हे सांगायला भाग पाडू नका. मी सांगू शकतो. सर्वांना समान वाटप करण्यात यावे. कोणालाही देऊ नये, अशी माझी मुळीच इच्छा नाही, असंही अंबादास दानवे म्हणाले.