‘दिल्या घरी तू सुखी राहा..!’ अशोक टेकवडेंच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया
![Ajit Pawar said that you should be happy when you give](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/ashok-tekawade-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
पुणे : पुरंदरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टेकवडे हे पुरंदरमधील मोठं नाव आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने समाचार घेतला आहे.
पत्रकारांनी अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता. अजित पवार म्हणाले की, अरे बाप रे , आता अवघड झालं.. म्हणजे मला आता बारामती लोकसभा मतदार संघात जीवाचं रान करावं लागणार..! अहो काय आम्हीच त्यांना आमदार केलं ना, आम्ही आमदार केलं म्हणूनच ते आमदार झाले ना, ते माजी झाले म्हणून तुम्ही त्यांना महत्व देता ना.
हेही वाचा – RBI ने २००० रूपयांच्या नोटा वितरणातून काढल्या; अर्थराज्यमंत्री म्हणाले..
आज त्यांना डायरेक्टर मी केलं, बँकेचं चेअरमन मी केलं, तिथं आमदार केलं, काही वेगळे प्रश्न आहेत ते तुमच्या समोर सांगण्याच कारण नाही, मी ज्यावेळी पुरंदरला सभा घेईल त्यावेळी सांगेल. जवळार्जून त्यांचं गाव आहे. त्यांच्या गावामध्ये सरपंच पदावर अविश्वास ठराव आणला. अशोकराव यांच्या जवळचा सरपंच करायचा होता. त्यांना सरपंच करता आला नाही, तो सरपंच झाला नाही म्हणून हे महाराज नाराज झाले. ते नाराज झाले म्हणून तो राग आमच्यावर त्यांनी काढला. ठीक आहे असे राग निघत असतात. त्यामुळे दिल्या घरी तू सुखी राहा, अशा शुभेच्छा अजित पवार यांनी टेकवडे यांना दिल्या आहेत.