पुणे विद्यापीठातील रॅप गाणे प्रकरणाची शासन स्तरावर दखल घ्यावी; अजित पवारांची पत्राद्वारे मागणी
![Ajit Pawar said that the issue of rap song in Pune University should be taken into consideration at the government level](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/ajit-pawar-1-2-780x470.jpg)
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप गाणे चित्रीत केल्याच्या प्रकरणाच्या चौकशी साठी उच्चस्तरीय चौकशी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहीत या घटनेची शासन स्तरावर दखल घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
अजित पवार यांनी पत्रात म्हटलं आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि विद्यापीठ वास्तूला फार मोठा इतिहास आहे. असं असताना या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, अधिसभा भरते त्या ठिकाणी अश्लील भाषेतील रॅप सॉंगचे शूटिंग झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळिमा फासणारा आहे. यामुळे राज्यातील जनतेत प्रचंड संतापाची भावना आहे.
पोलीस तपास आणि चौकशी समितीचा अहवाल तातडीनं प्राप्त करून घेऊन संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासन स्तरावरूनही आदेश देण्यात यावेत. भविष्यात असा प्रकार कोणत्याही विद्यापीठात अथवा शिक्षण संकुलात होणार नाही, या दृष्टिकोनातून शासनामार्फत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात याव्यात, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या समोर एका तरूणांना अश्लील शब्द असलेलं रॅप गाणं गायले. या रॅप गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. शुभम जाधव असं या तरूण रॅपरचं नाव आहे. त्याने केलेल्या या कृत्यामुळे प्रशासनाने संताप व्यक्त केला. विद्यापीठाच्या तक्रारीनंतर चतुर्श्रुंगी पोलिसांनी संबंधित रॅपरला चौकशीसाठी बोलावलं आहे. या तरूणाची आता चौकशी केली गेली.